जळगाव (प्रतिनिधी) महानगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कर व पाणीपट्टी कराच्या थकबाकीदार मिळकत धारकांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरु केली आहे. शहरातील मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या थकबाकीची वसूली करण्यासाठी महानगरपालिकेने ‘शास्ती माफी’ अभय योजना सुरू केली होती, मात्र तरीही काही मिळकत धारकांनी कर भरणा केलेला नाही. यामुळे प्रशासनाने आता थकबाकीदार मिळकत धारकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार, प्रभाग समिती क्र. १ अंतर्गत २ थकबाकीदारांच्या मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून, या मिळकतींवरील एकूण थकबाकी १०,०७,०९३ रुपये आहे. तसेच, प्रभाग समिती क्र. २ मध्ये १ थकबाकीदाराच्या मिळकतीवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे, ज्यावर २,६८,३१६ रुपये थकबाकी आहे. प्रभाग समिती क्र. ३ मध्येही १ थकबाकीदाराच्या मिळकतीवर जप्तीची कारवाई केली गेली आहे.
सदर मिळकतींवर एकूण ६०,१०० रुपये थकबाकी आहे. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका प्रशासनाने सर्व थकबाकीदार मिळकत धारकांना आवाहन केले आहे की, ते लवकरात लवकर मालमत्ता कराचा भरणा करावेत. १ जानेवारीपासून महानगरपालिकेने शास्ती माफीची अभय योजना सुरू केली आहे, ज्यात ३१ जानेवारीपर्यंत संपूर्ण कर भरण्याने शंभर टक्के शास्ती माफी मिळवता येईल. तसेच, जे थकबाकीदार भरणा करणार नाहीत, त्यांच्यावर नळ बंद करण्याची कारवाई तसेच जप्तीची कारवाई महानगरपालिका करणार आहे.
सदर कालावधीत, महानगरपालिकेने प्रभाग समिती कार्यालय क्रमांक १ ते ४ अंतर्गत एकूण ५४४ थकबाकीदार मिळकतींवरील नळ संयोजन बंद करण्याची कारवाई केली आहे. शास्ती माफीची अभय योजना सुरू झाल्यापासून, म्हणजेच १ ते २५ जानेवारी या कालावधीत, मालमत्ताधारकांनी एकूण ६ कोटी ३८ लाख रुपये कर भरणा केला आहे.
प्रभाग समितीनिहाय झालेली वसुली
प्रभाग समिती कार्यालय क्रमांक १-१.८३ कोटी
प्रभाग समिती कार्यालय क्रमांक २ – १.४९ कोटी
प्रभाग समिती कार्यालय क्रमांक ३-१.९९ कोटी
प्रभाग समिती कार्यालय क्रमांक ४ – १.०५ कोटी