नाशिक (वृत्तसंस्था) नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या १२०० ने वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढताना पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा बैठक घेतली. नाशिक जिल्ह्यातील परिस्थिती सुधारली नाही तर कडक निर्बंध लावावे लागतील असा इशारा भुजबळ यांनी या बैठकीत दिला आहे.
नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पोस्ट कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. शहरातील बिटको रुग्णालयातही पोस्ट कोविड सेंटरची उभारणी केली जाणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून कोविड पश्चात रुग्णांची काळजी घेतली जाणार आहे. पोस्ट कोविड सेंटरच्या माध्यमातून कोरोना होऊन गेल्यानंतर काय काळजी घ्यावी लागणार याबाबत समुपदेशन केलं जाणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यात सध्या ३ हजार २०० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिवाळीनंतर वाढत गेलेल्या रुग्णसंख्येमुळं नाशिक जिल्हा प्रशासन चिंतेत आहे. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजवर असलेल्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध करुन देण्याचं नवं आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभं राहिलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिककरांना इशारा दिला आहे.