जळगाव (प्रतिनिधी) मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी अर्ज दाखल केला होता. अटकपूर्व जामीन अर्जावर दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. पुढील सुनावणी आता २६ सप्टेंबर रोजी होणार आहे.
न्यायालयात दोन्ही बाजूने सुमारे तासभर युक्तिवाद
मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बकाले यांना निलंबित करून नाशिक येथे हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, हजर न होता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला असून ते भूमिगत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी पुन्हा सुनावणी झाली. न्यायाधीश बी. एस. धिवरे यांच्या न्यायालयात दोन्ही बाजूने सुमारे तासभर युक्तिवाद सुरू राहिला. मात्र, त्यावर निकाल राखून ठेवण्यात आला.
समाज बांधवांची न्यायालयाबाहेर गर्दी
बकाले यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी कामकाज होणार असल्यामुळे न्यायालयाच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह चारही पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त होता. तर मराठा समाज बांधवांचीसुद्धा न्यायालयाच्या बाहेर गर्दी झाली होती.
आमदार मंगेश चव्हाण, सुरेश भोळे यांच्यासह समाज बांधव हजर
आमदार मंगेश चव्हाण, सुरेश भोळे यांच्यासह मराठा समाजाचे पदाधिकारीसुद्धा यावेळी उपस्थित होते. सरकार पक्षातर्फे अॅड. पंढरीनाथ चौधरी यांच्यासह फिर्यादी व समाजाच्यावतीने अॅड. गोपाळ जळमकर, अॅड. मोहन पाटील, अॅड. सचिन पाटील यांनी जोरदार युक्तिवाद हरकत घेतली. संशयिताने केलेले वक्तव्य माणसाला इजा पोहोचविणारे आणि घृणास्पद वक्तव्य आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता तपास कामात सर्व बाबींचा उलगडा होणे गरजेचे आहे. त्यामुळे अटकपूर्व अर्ज नामंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद सरकारपक्षाकडून करण्यात आला. तर बकाले यांच्यावतीने औरंगाबाद येथील अॅड. घाणेकर यांचे सहायक कुलदीप कहाळेकर व संताेष सकर यांनी बाजू मांडली. सर्वच वकीलांनी उच्च न्यायालयातील खटल्यांच्या निकालांचे दाखले दिले. सुनावणीच्या वेळी मोठा जनसमुदाय न्यायालयात जमला होता.