दरभंगा (वृत्तसंस्था) बिहारमधील (Bihar) दरभंगा मेडिकल कॉलेज (Darbhanga Medical College) आणि हॉस्पिटल परिसरात विद्यार्थ्यांत जोरदार वाद झाला. यात ४ दुकानं, दुचाकीसह २ गाड्या जाळण्यात आल्या आहेत. तसेच या आगीत ४ जणांना पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, तर एका तरुणावर कात्रीनं वार करण्यात आला.
दरभंगा मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आणि मेडिकल दुकानदार यांच्यात झालेल्या वादातून या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली. दुकानदाराच्या म्हणण्यानुसार, मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी मॅगी घेण्यासाठी किराणा दुकानात पोहोचले. त्यावेळी दुकानदार दुकानात नव्हता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शेजारील मेडिकल दुकानात बसलेल्या दुकानदाराला याबाबत विचारणा केली. मेडिकल दुकानातील कर्मचाऱ्यानं थांबा.. दुकानदार काही वेळात येतील, असं सांगितलं. त्यानंतर विद्यार्थ्यांनी या कर्मचाऱ्यासोबत वाद घालायला सुरुवात केली.
इतक्यात विद्यार्थ्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना बोलावून घेतलं. या वादातून एका विद्यार्थ्यानं मेडिकल दुकानातील कर्मचाऱ्याच्या तोंडावर कात्रीने वार केले. त्यानंतर धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. हा गोंधळ ऐकून दुकानमालक घरातून बाहेर आले. दरम्यान, दुकानदारांशी वाद घालत असताना विद्यार्थ्यांनी दुकानदारांवर पेट्रोल फेकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. जावेद खान असं दुकानदाराचं नाव आहे. दरम्यान, एसडीपीओ कृष्ण नंदन कुमार यांनी सांगितलं की, घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यातील पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणलीय, असं नमूद केलं. दरम्यान, आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेले अग्निशमन दलाचे जवानही यात गंभीर जखमी झाले आहेत. तसेच मेडिकल कॉलेजचे ४ ते ५ विद्यार्थी जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय. मात्र, अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.