धरणगाव (प्रतिनिधी) येथील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तथा भौगोलिक सीमा १८ ऑगस्टला प्रसिद्ध झाली. धरणगाव शहरात २३ सदस्यांसाठी ११ प्रभागांची रचना झाली आहे, तर ३१ ऑगस्टपर्यंत या संदर्भात हरकती व सूचना मागवण्याची मुदत देण्यात आली आहे.
धरणगाव पालिकेच्या कार्यालयात प्रारूप रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर संबंधितांनी 18 ते 21 ऑगस्टपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत धरणगाव पालिका कार्यालयातील मुख्याधिकाऱ्यांकडे हरकती व सूचना सादर कराव्या लागणार आहेत. तर हरकती व सूचना दाखल केलेल्या नागरिकांना सुनावणीसाठी स्वतंत्रपणे कळवले जाईल, असे मुख्याधिकारी तथा प्रशासक रामनिवास झंवर यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, गत अनेक दिवसांपासून इच्छुक उमेदवारांना आपली प्रभाग रचना कशी असेल ? याबाबत उत्सुकता होती. सन २०१६ साली झालेल्या निवडणुकीत एकुण ९ प्रभाग होते. यात १९ सदस्य निवडून आले होते. यंदा दोन प्रभाग म्हणजेच चार सदस्य संख्या वाढली आहे. तर अनेकांच्या प्रभाग रचनेत ही बदल झाले आहेत. त्यामुळे ‘कही खुशी, कही गम’ अशी स्थिती आहे. हरकतींची प्रक्रिया आटोपल्यावर सप्टेंबर महिन्यात अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. दरम्यान, आता कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण निघते व नगराध्यक्ष पदाचे आरक्षण काय निघते? आणि ही प्रक्रिया कधी होते? याकडे इच्छुकांचे लक्ष लागलेले आहे.
नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदांसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग येणार आहे. कारण त्यानंतर खऱ्या अर्थाने इच्छुक कामाला लागतील. त्यामुळे या आरक्षणाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, प्रभाग क्र. ११ हा शहरातील सर्वात मोठा प्रभाग ठरला. या प्रभागांची लोकसंख्या ४ हजार ३९७ आहे. तर सर्वात लहान प्रभाग क्र ४ची लोकसंख्या २ हजर ८५० इतकी इच्छुकांचा संपर्कावर भर धरणगाव पालिकेत नगरसेवक होण्यासाठी इच्छुक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या प्रभागात नागरिकांशी संपर्क अभियान सुरू केले आहे. तर अनेकांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे नागरिकांच्या भेटी घेण्यावर भर दिल्याचे चित्र दिसत आहे. यंदा निवडणुकीत तरूणांचा उत्साह पहायला मिळत आहे. तर अनेक इच्छुकांनी पक्षाचे तिकीट मिळावे, यासाठी संबंधित पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डींग लावली आहे.
नगराध्यक्ष पदाकडे लक्ष
धरणगाव पालिकेच्या जागांचे आरक्षण यापूर्वीच निश्चित झाले आहे. त्यात २३ जागापैकी अनुसूचित जातीसाठी १ जागा, अनुसूचित जमातीसाठी १, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ४ जागा असून त्यापैकी ४ महिला राखीव आणि सर्वसाधारण प्रवर्गात ९ महिला राखीव व ४ अराखीव अशा जागांचे आरक्षण निश्चित असल्याचे समजते. धरणगाव शहराची एकूण लोकसंख्या १ जुलै २०२५च्या प्रारूप यादी नुसार ३४ हजार ७५४ आहे.