जळगाव ( प्रतिनिधी ) : वडीलांना भेटण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थ्याला रस्त्यात अडवून एकाने त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तर दुसऱ्याने धारदार चाकूने त्याच्यावर वार करीत जखमी करीत तेथून पसार झाले. ही घटना दि. २२ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास बजरंग बोदद्याजवळ घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल केला असून गणेश गोपाळ मराठे (रा. मयूर कॉलनी) याला अटक करण्यात आली आहे.
शहरातील मयूर कॉलनीत मोहीत हेमंत गुजर (वय १८) हा तरुण वास्तव्यास असून तो शिक्षण घेत आहे. मोहीत हा मानराज पार्कजवळील एका कन्सट्रक्शन येथे काम करुन तो मालकाकडेच राहतो. दि. १९ रोजी त्यांच्या कॉलनीत राहणाऱ्या गणेश गोपाळ मराठे याच्यासोबत वाद झाला होता. याप्रकरणी दोघांनी परस्परविरोधात पोलिसात तक्रार दिल्यामुळे गुन्हा दाखल आहे. दि. २२ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मोहीत हा त्याच्या वडीलांना टॉवर चौकात भेटण्यासाठी जात होता. त्यावेळी ताब्यात बजरंग बोगद्याजवळून जात असतांना गणेश मराठेसह तोंडाला रुमाल बांधलेल्यांनी त्याला अडविले.
अन् धारदार चाकूने केले वार
रुमाल बांधलेल्या मुलाने मोहीतच्या डोक्यात लाकडी दांडका मारला असता, मोहीत हा रस्त्यावर कोसळला. लागलीच दुसऱ्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर गणेश मराठे याने त्याच्या हातातील धारदार चाकूने मोहीतच्या पाठीवर वार करुन त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर मारहाण करणारे तिघे तेथून पसार झाले.
हल्ला करणाऱ्याला अटक
जखमी अवस्थेत पडलेल्या मोहीतला काही जणांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असून त्याच्या तक्रारीवरुन गणेश गोपाळ मराठे याच्यासह दोन अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, जिल्हापेठ पोलिसांनी गणेश मराठे रा. मयुर कॉलनी याला अटक केली आहे.