जळगाव (प्रतिनिधी) शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे धागेदोरे हे एमआयडीसीतील ड्रग्स पेडलर असलेला अबरार कुरेशीपर्यंत पोहचले होते. त्याचा शोध सुरु असतांना स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी त्याच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. दरम्यान, पोलिस दलात कर्तव्य बजावतांना आपण कोणाच्या संपर्कात रहावे याचे भान न ठेवल्याप्रकरणी एलसीबीतील उपनिरीक्षक दत्ता पोटे यांना निलंबीत करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले.
पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अवैध धंदे चालकांसोबतचे संबंध अनेकदा उघड झाले आहे. त्यामुळे अनेकदा त्यांच्यावर निलंबणासह कठोर कारवाई देखील झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ड्रग्स पेडलरच्या संपर्कात असल्याप्रकरणी चौकशी केली जात होती. ही चौकशी सुरु असल्यामुळे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांची पोलीस अधीक्षकांनी पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात उचलबांगडी केली होती. त्यानंतर त्यांची जळगाव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपुर्वीच या चौकशीचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्यावर ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबन काळात या प्रकरणाची चौकशी भुसावळ विभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे.