बोदवड (महेंद्र पाटील) येथील आत्मसन्मान फाऊंडेशनच्या मदतीने घरापासून दुरावलेल्या विनोदला पुन्हा कुटुंबात परतता आले आहे. आत्मसम्मान फाउंडेशन संचालित प्रमिलाताई आणि मोहनराव मनोरुग्ण सहाय्यता व पुनर्वसन केंद्रात मागील एक वर्षापासून आश्रय घेत असलेला एक मनोयात्री “विनोद” पूर्णपणे बरा झाला असून त्याला इंदौर येथे आपल्या घरी नुकतेच पोहोचवण्यात आले आहे.
आईच्या अचानक झालेल्या निधनाचा मानसिक परिणाम होऊन विनोद सैरभैर झाला होता. तो इंदौर येथील राहत्या घरून बाहेर निघून गेला. बिकट मानसिक अवस्थेत या शहरातून दुसर्या शहरी गावोगावी भटकत असणारा विनोद एक वर्षांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात अत्यंत खराब झालेले कपड़े , वाढलेले केस अतिशय बिकट अवस्थेत होता. त्याच्या विषयी फाउंडेशनच्या सदस्यांना माहिती मिळाली व आत्मसम्मान निवासी मनोरुग्ण पुनर्वसन प्रकल्पापर्यंत विनोद पोहोचला. इथे आश्रय मिळून विनोदची जेवणा पासून तर झोपेपर्यंत येथील कार्यकर्त्यांनी काळजी घेतली.
सोबतच मानसिक उपचार , दररोज च्या सकारात्मक दिनचर्ये मुळे विनोद पूर्णपणे बरा झाला व त्याने भूतकाळातील झालेल्या घटना व त्याचा परदेशी पुरा शिवजी के मंदिर के पास इंदोर असा पत्ता त्याने सांगितला. त्यानंतर आत्मसम्मान कडून त्याच्या घरच्यांशी संपर्क करण्यात आला व विनोदला बोदवड वरुन इंदोर येथे घरा पर्यंत सुखरूप पोहचविण्यात आले. कुटुंबा सोबत दोन वर्षानंतर त्याची भेट झाली. त्याच्या चेहर्यावरील व कुटुंबीयांच्या चेहर्यावरील आनंद शब्दात होत नव्हता. विनोदचे मूळ नाव हरिष असल्याचे सांगत वडील रामलाल शर्मा, योगेश आणि कमल शर्मा यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी सर्व आत्मसन्मान फाऊंडेशनचे आभार मानले.
आत्मसम्मान फौंडेशनच्या माध्यमातून या आधीही नांदेड, सुरत, या सारख्या शहरातील भटकत असतांना सापडलेल्या काही मनोरुग्णांना पुनर्वसन केंद्रात आणून त्यांच्यावर उपचार करून त्यांना घराची आठवण झाल्यावर त्यांच्या घरी सुखरूप पोहचवले आहे. सध्या या निवासी मनोरुग्ण निवासी सहाय्यता केंद्रामध्ये ३५ बेघर, अनाथ महिला व पुरुष मनोरुग्ण असून त्यांची काळजी फाऊंडेशन मार्फत घेतली जात असते.