औरंगाबाद (वृत्तसंस्था) कौटुंबिक वादातून औरंगाबादेत विवाहितेने दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पडक्या विहिरीत उडी घेऊन महिलेने दोन चिमुकल्यांसह आयुष्य संपवलं. पैठण तालुक्यातील गेवराई तांडा गावात ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कौटुंबिक वादातून विवाहितेने दोन्ही चिमुकल्यांसह आत्महत्या केली आहे तर मृत महिलेच्या नातेवाईकांनी हा घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. वैशाली रविंद्र थोरात (वय २७), अरोही रविंद्र थोरात (वय ६ वर्षे) आणि आयुष रविंद्र थोरात (तीन वर्ष सर्व रा. गेवराई) अशी मृतांची नावे आहेत. सुनीता शेखर देसरडा यांचे गेवराई तांडा येथील निर्लेप कंपनीच्या पाठीमागे शेत असून या शेतातील विहिरीत त्यांच्या कामगाराला तीन मृतदेह तरंगताना दिसून आले. या घटनेची माहिती त्याने चिकलठाणा पोलिसांना दिली. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने हे मृतदेह बाहेर काढल्यावर मृत महिला ही गेवराई येथील रहिवासी असल्याचे परिसरातल्या लोकांनी सांगितले. या घटनेची माहिती मृत महिला वैशाली हिच्या सासरच्या लोकांना देण्यात आली. त्यानंतर तिच्या माहेरच्या लोकांना या दुर्दैवी घटनेची तातडीने माहिती देण्यात आली.
घटनास्थळी पोहचलेल्या माहेरच्या लोकांनी वैशाली व तिच्या मुलांचा घातपात करण्यात आल्याचा आरोप केला आहे. वैशाली आणि तिच्या दोन्ही चिमुकल्यांचे घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. माहेरच्या नातेवाईकांनी दोषी व्यक्तींना अटक करेपर्यंत आम्ही तिन्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. या घटनेची चिकलठाणा पोलिसांनी नोंद केली.