पारोळा (प्रतिनिधी) तमाशा मंडळातील २० वर्षीय तरुणी व १९ वर्षीय तरुणाने विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केल्याची घटना पारोळा शहरात घडली. अंजली अशोक नामदास (वय २०, रा. दत्त कॉलनी, भुसावळ) व योगेश उर्फ सुनील नामदेव बोरसे (वय १९, रा. अंजाळे, ता. यावल) अशी दोघा मयतांची नावे आहेत.
यासंदर्भात अधिक असे की, भिका-नामा तमाशा मंडळ हे धुळे जिल्ह्यातील बाबुळवाडी येथून येथे दि. २४ रोजी दुपारी तमाशाचे काम आटोपून दुसऱ्या ठिकाणी जात होते. पण पारोळा शहरातील कजगाव रोडवरील पेट्रोल पंपाजवळ वाहन नादुरुस्त झाल्याने थांबले होते. तमाशा मंडळातील तरुणी अंजली अशोक नामदास व योगेश उर्फ सुनील नामदेव बोरसे हे दोन्ही तमाशा मंडळातच काम करतात. दोघांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले की, बाजारात जाऊन येतो, असे सांगून दोन्ही जण निघून गेले. ते लवकर न आल्याने मंडळातील अन्य सहकाऱ्यांनी शोध घेतला. तेव्हा ते बाजारात होते. त्यावेळी त्यांना विचारपूस केली असता एवढा वेळ का लागला? त्यांनी सांगितले की आम्ही दोघांनी काहीतरी विषारी औषध सेवन केला आहे, असे सांगितले.
दोघांची एकमेकाशी घट्ट मैत्री
दरम्यान, दोघांना सहकाऱ्यांनी लगेच एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर २५ रोजी पुढील उपचारार्थ पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. तेव्हा अंजलीची प्राणज्योत दुपारी दोनला मालवली, तर योगेशचा सायंकाळी सहाला मृत्यू झाला. याबाबत दोघांच्या नातेवाईकांनी पारोळा पोलिसात खबर दिली. या घटनेने फडात एकच शांतता पसरली होती. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही, पण दोघांची एकमेकाशी घट्ट मैत्री होती, असे बोलले जात होते.