नवी दिल्ली । राज्यसभेत कृषी सुधारणा विधेयकावरून झालेल्या गोंधळानंतर निलंबित करण्यात आलेल्या आठ सदस्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपण स्वतः आज दिवसभर अन्नत्याग करत आहोत, असे ज्येष्ठ नेते, राज्यसभा सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले.
पुढे म्हणाले, उपाध्यक्षांनी सदस्यांचं ऐकायला हवं होतं, पण तसं न करता, आवाजी पद्धतीनं मतदान घेतलं गेलं. त्यामुळे सदस्यांची नाराजी साहजिक आहे. सदस्यांनी संसदेच्या आवारात सदस्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. मी नव्हतो ही गोष्ट खरी, पण बाकीचे आमचे सहकारी सभागृहात उपस्थित होते. राज्यसभा सदस्यांनी अन्नत्याग केला. त्यांच्यासोबत आम्ही आहोत. मीही आज दिवसभर अन्नत्याग करणार.
राज्य सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत अशी शक्यता वर्तवणाऱ्या गृहमंत्र्यांच्या विधानावर शरद पवार यांनी बोलण्यास नकार दिला. ते गृहमंत्री आहेत त्यांनाच विचारा असं उत्तर त्यांनी दिलं.
परवा (20 सप्टेंबर) लोकसभा आणि राज्यसभा सभागृहांमध्ये दोन कृषी विधेयकं मंजूर झाली. या दोन्ही विधेयकावर राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. दोन्ही सभागृहातील राष्ट्रवादीच्या खासदारांनी विधेयकांना स्पष्ट विरोध दर्शवला नाही. मात्र, नंतर राष्ट्रपतींना ज्या 15 विरोधी पक्षांनी पत्र लिहून विधेयकावर स्वाक्षरी न करण्याची विनंती केली, त्या पत्रावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचीही स्वाक्षरी होती.