जालना (वृत्तसंस्था) रविवारची सुट्टी असल्याने पोरांना बागेत खेळण्यासाठी नेलं. मात्र, घरी परताना दुचाकीला आयशरने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात तीन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अंबड चौफुली ते मंठा चौफुली दरम्यानच्या रेल्वे उड्डाण पुलाजवळ संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.नुरेन फातेमा सादेक शेख (वय 7 वर्षे), आयेजा फातेमा सादेक शेख (वय 5 वर्षे) अदाबिया फातेमा सय्यद शोएब (वत 9 वर्षे, सर्व रा. तद्वपुरा, जालना) अशी मृतांची नावे आहेत.
आयशरची पाठीमागून दुचाकीला धडक !
रविवारची सुट्टी असल्याने सय्यद शोएब हे आपल्या चिमुकल्यांसह साडूच्या लेकरांना घेऊन सायंकाळी पाचच्या सुमारास मोतीबागेत खेळण्यासाठी घेऊन गेले होते. मुलांचे खेळणे झाल्यानंतर सय्यद शोएब खरेदीसाठी मॉलमध्ये घेऊन गेले. खरेदी झाल्यानंतर ते सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवर पुढे एक मुलगी आणि मागे दोन मुलांना घेऊन सय्यद शोएब घरी निघाले. याचवेळी बायपास मार्गावरील उड्डाणपुलावर पाठीमागून येणाऱ्या आयशरने दुचाकीला जोराची धडक दिली.
नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला !
या अपघातात अदाबिया फातेमा सय्यद शोएब, नुरेन फातेमा सादेक शेख, आयेजा फातेमा सादेक शेख यांचा जागीच मृत्यू झाला. तर सय्यद शोएब आणि अन्य एक मुलगा गंभीर जखमी झाला. दरम्यान, अपघाताची माहिती त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात डॉक्टरांनी तीनही चिमुकल्यांना मृत घोषित करताच नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश बघून अनेकांचे डोळे पाणावले होते.
















