जळगाव (प्रतिनिधी) पाईप चोरी प्रकरणातील मुख्य संशयित मनपाचे माजी विरोधीपक्ष नेते सुनिल महाजनांचा इतर संशयितांसोबत संपर्कात असून त्यांच्यामध्ये शेकडो कॉल झाले आहेत. महाजन जो मोबाईल क्रमांक वापरत होते तो त्यांच्या नावावर जरी नसला तरी तो त्यांच्या बँक खात्यासोबत लिंक असून तोच क्रमांक महापालिकेच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्जावर नमूद आहे. असे अनेक मुद्दे तालुका व रामानंद पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या (से) मध्ये नमूद केले आहे. दरम्यान, त्यावर युक्तीवाद करण्यासाठी दि. १७ रोजी कामकाज होणार आहे.
ब्रिटीशकालीन बिडाची पाईपलाईनसह भंगार साहित्य चोरी प्रकरणी मनपाचे माजी विरोधीपक्ष नेते सुनिल महाजन यांच्यासह सात जणांविरुद्ध रामानंद नगर व तालुका पोलिसात दोन असे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. या तिन्ही गुन्ह्यांमध्ये संशयित सुनिल महाजन यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर न्या. एस. एन. राजूरकर यांच्या न्यायालयात रामानंद व तालुका पोलिसांनी मंगळवारी आपले म्हणणे (से) मांडला. कामकाजावेळी सुरुवातीला तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीनासाठी कामकजावेळी महाजनांचे वकील अॅड. जैनोद्दीन शेख यांनी या अर्जाचे कामकाज पाहणार नसल्याची माहिती न्यायालयाला दिली. त्यानंतर दुपारी आमचा गैरसमज झाल्यामुळे त्या जामीन अर्जाचे कामकाज मीच पाहणार असल्याचे सांगून त्यांनी वकीलपत्र कायम ठेवले.
गुन्हा दाखल होण्यापुर्वीच महाजनांनी बँक खाते केले बंद
पोलिसांनी दाखल केलेल्या से मध्ये त्यांनी सुनिल महाजनांसह इतर संशयितांच्या बँक खात्याची पडताळणी बाकी आहे. ते सर्व संशयित अनेक दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने व दप्तर, इतर साहित्य जप्त करणे बाकी असून यामध्ये संशयित संशयितांचा सहभाग आहे का याची देखील तपासणी केली जात आहे. तसेच गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच मुख्य संशयित सुनिल महाजन यांनी त्यांचे कॅनरा बँकेत असलेले बँक खात्यातून ५३ हजार रुपये काढून ते खाते बंद केल्याचे पोलिसांनी से मध्ये नमूद केले आहे.
सरकारी वकीलांकडून हरकत कायम
रामानंद नगर व तालुका पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्यात अॅड. सागर चित्रे यांनी वकील पत्र दाखल करुन पोलिसांच्या म्हणणे (से) वर युक्तीवाद करण्यासाठी मुदत मागितल्यामुळे दि. १७ रोजी यावर कामकाज होणार आहे. दरम्यान, तिघ अटकपूर्व जामीन अर्जाला जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा यांनी हरकत घेत खुलासा सादर केला.
सादीक खाटीकचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला
भंगार चोरी प्रकरणात अटकेत असलेला माजी नगरसेविकेचा पती भंगार ठेकेदार सादीक बिसमिल्ला खाटीक (वय ५५, रा. गुलाबाबाब कॉलनी) यांची पोलीस कोठडीची मुदत संपली. त्यांना मंगळवारी न्या. एम. एम. बढे यांच्या न्यायालयात हजर करणयात आले. यावर सरकारी वकीलांनी प्रभारी युक्तीवाद केल्यामुळे संशयिताला दि. १३ रोजी पर्यंत दोन दिवसाची वाढीव पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे संशयिताचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे.