मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाच्या अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिंदे गटाच्यावतीने १६ आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याचिकेत दोन गोष्टींचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.
शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आता निवाड्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. दोन्ही बाजू स्वतःची बाजू ‘सच्चाई’ची असल्याचा दावा करत आहेत. एक तर आमदारांनी उपाध्यक्षांना बेकायदेशीर ठरवून आमदारांना अपात्र ठरविण्याच्या नोटिशीला आव्हान दिले आहे. शिवसेनेने शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांना अपात्र करण्याची नोटीस बजावली होती. दुसरे म्हणजे त्यांनी स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला न्यायालयाकडून संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
गटातील एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करणार आहेत. तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने देवदत्त कामत लढणार आहेत. उपाध्यक्षांसाठी अधिवक्ता रविशंकर जंध्याला लढणार आहेत. सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
















