नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. शरद पवार गटाने ही याचिका दाखल केली होती. न्यायालयाने अजित पवार यांना दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेश देत पुढील सुनावणी ६ ऑगस्टपर्यंत तहकूब केली.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील पक्ष आणि निवडणूक चिन्हाची लढाई आता पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशात, शरद पवार गटाने निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. याबाबत माहिती देताना शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुनावणी झाल्याचे पत्रकारांना सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला उत्तर दाखल करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. यानंतर शरद पवार गटाला जोडपत्र दाखल करायचे असेल, तर त्यासाठी सुद्धा एक आठवड्याचा वेळ दिला जाईल. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑगस्ट रोजी होणार आहे. दरम्यान, या प्रकरणाचा निकाल चार-पाच सुनावणीनंतर लागेल, अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे मत आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.