अकोला (प्रतिनिधी) सहकार क्षेत्रातील खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष असलेल्या मा. सुरेशदादा खोटरे यांनी सहकार क्षेत्रामध्ये दिलेल्या भरीव योगदान तसेच शेतकऱ्यांसाठी उभ्या राहिलेल्या विविध चळवळींमधून दिलेल्या सक्रिय सहभागाची नोंद रायबा बहुउद्देशीय संस्था, धुळे यांनी घेऊन त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा कृषिरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
रायबा बहुउद्देशीय संस्था धुळे, क्रांतीज्योत प्रतिष्ठान नंदुरबार व नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमद्वारे दरवर्षी देण्यात येणाऱ्या कृषिरत्न पुरस्कारासाठी यावर्षी माननीय सुरेशदादा खोटरे यांची निवड करण्यात आलेली आहे. ग्रामविकास मंडळ नवलनगर संचालित क्रांतिवीर नवल भाऊ कला महाविद्यालय नवलनगर जि. धुळे व संजय एज्युकेशन सोसायटी संचालित, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नवलनगर जि. धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने 23 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित भव्य सत्कार समारंभामध्ये सदर पुरस्कार देऊन सुरेशदादा खोटरे यांना सन्मानित करण्यात आले.
सहकार क्षेत्रामध्ये काम करीत असताना सुरेशदादांनी शेतीसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी अनेक नवीन नवीन उपक्रमांना सुरुवात करून त्या उपक्रमांना चालना देत शेतकऱ्यांना अनेक सुविधा प्राप्त करून दिल्या. शेतकऱ्यांच्या विविध समस्यां सोडवीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. या क्षेत्रामध्ये काम करीत असताना शासनाच्या अनेक योजनांचा पाठपुरावा करीत त्या आपल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना कशाप्रकारे मिळवून दिल्या जाऊ शकतात त्यासाठी सतत पाठपुरावा करीत शेतकऱ्यांना त्या योजना मिळवून दिल्या.
सुरेश दादा खोटरे हे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे कार्यकारणी सदस्य असून त्या माध्यमातून त्यांनी अनेक शेती उपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवत शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. सुरेशदादा अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक आहेत. संचालक म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कर्ज देऊन शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. सोबतच सुरेशदादा ज्ञानगंगा ग्रामीण शिक्षण संस्था शिरसोली ता. तेल्हाराचे अध्यक्ष आहेत. शिक्षण संस्थेची स्थापना करून सुरेशदादांनी परिसरातील शिक्षणाची समस्या दूर केली आहे. अशा प्रकारे सुरेशदादा खोटरे यांनी सामाजिक, शैक्षणिक, कृषी, सांस्कृतिक, कला, क्रीडा व राजकीय क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करून समाजऋण फेडण्याचे प्रयत्न केले आहेत.