नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार रामस्वरुप शर्मा यांचा संशायस्पद मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयाशेजारीच शर्मा यांचा फ्लॅट असून या फ्लॅटमध्ये आज सकाळी त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खासदार रामस्वरूप शर्मा यांचं घर आतून बंद होतं. त्यांनी गळफास घेतलेला होता. पोलिसांनी सांगितलं की त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं मात्र दवाखान्यात पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात अद्याप तरी कुठलीही सुसाईड नोट सापडलेली नाही. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दरम्यान, माहिती मिळताच केंद्रीय वित्त राज्य मंत्री अनुराग ठाकूर रामस्वरूप शर्मा यांच्या घरी पोहोचले आहेत. तसेच शर्मा यांच्या मृत्यूनंतर आज संसदीय पक्षाची बैठक रद्द करण्यात आली आहे.
कोण आहेत रामस्वरुप शर्मा
रामस्वरुप शर्मा हे हिमाचल प्रदेशातील जोगिंदरनगरचे रहिवासी आहेत. ते सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते. खासदार बनण्यापूर्वी ते मंडी जिल्ह्याचे भाजपचे सचिव होते. त्यानंतर हिमाचल प्रदेशचे भाजपचे सचिव होते. ते हिमाचल प्रदेशच्या फूड अँड सिव्हील सप्लाय कॉर्पोरेशनचे अध्यक्षही होते.