जळगाव (प्रतिनिधी) गरजू लोकांना धान्य वाटपाच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करा, अशी मागणी सामजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान, भाजप कार्यालयातील कार्यक्रमात माजी मंत्री आ. गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
शनिवारी सकाळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी माजी मंत्री आ. गिरीश महाजन, पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह दिव्यांग बांधव उपस्थित होते. याच बाबत सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, सोशल मीडियावरील वृत्तानुसार, गरजू लोकांना धान्य देण्याचा कार्यक्रम आज (शनिवार) भारतीय जनता पक्षाच्या भाजपा कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. जो एक चांगला कार्यक्रम आहे. परंतु या कार्यक्रमात कोरोनाचे प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले नाही. तसेच कोरोनावर मात करण्यासाठी अद्याप प्रयत्न सुरू आहेत. अशा काळात गर्दी जमविण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिवंगत नेते गफ्फार मलिक यांच्या अंत्यसंस्कारावेळी नियमापेक्षा जास्त गर्दी झाल्याने जळगाव शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याचप्रमाणे प्रचलित नियमांनुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे तक्रारीत श्री.गुप्ता यांनी म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हाजी गफ्फार मलिक यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी झालेल्या दीपक कुमार गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत गफ्फार मलीक यांच्या तीन मुलांसह ५० जणांच्या जमावाच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.