मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षनेत्याला बिहारमधील विजयाचं श्रेय दिलं जातं, याचा आम्हाला आनंद आहे. याचा आनंद भाजनेही चार वर्ष साजरा करत बसावं. बिहारच्या विकासासाठी सगळ्या भाजप नेत्यांनी काम करावं यामुळे महाराष्ट्रात शांतता नांदेल अशा शब्दात सामनातून भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका करण्यात आली आहे.
बिहारमध्ये भाजपला मिळालेल्या यशावर शिवसेनेकडून टीका करण्यात आली आहे. बिहारमध्येही ठसठशीत आणि चमकदार कामगिरी असणारे तेजस्वी यादव यांनी विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली. महाराष्ट्रातही सर्वात मोठा पक्ष विरोधी पक्षात असल्याचा टोला शिवसेनेकडून लगावण्यात आला आहे. इतकंच नाही तर यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावरदेखील सामनातून टीका करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्रात चंद्रकांत पाटलांसारखे नेते अधूनमधून काही पुडय़ा सोडत असतात आणि महाराष्ट्राचे राज्य शरद पवार चालवत असल्याचे टोमणे मारत असतात. महाराष्ट्राचे राज्यपालही त्याच मताचे आहेत’ अशी टीका करण्यात आली आहे. नितीशकुमार यांना शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री केले हे ठीक; पण ही कायमस्वरूपी व्यवस्था असेल काय, हा प्रश्नच आहे. बिहारमध्ये ज्यांची कामगिरी ठसठशीत व चमकदार झाली असे तेजस्वी यादव विरोधी पक्षात बसले. महाराष्ट्रातही सगळय़ात मोठा पक्ष विरोधात बसला. त्याचेच प्रतिबिंब बिहारात पडले, पण महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्याला बिहारातील विजयाचे श्रेय दिले जात आहे याचा आम्हाला आनंद आहे. बिहारच्या विजयाचा आनंद भाजपने पुढची चार वर्षे साजरा करीत राहावे. बिहारला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी महाराष्ट्रातील अनुभवी भाजप नेत्यांची मदत घ्यावी. त्यामुळे बिहारला फायदा होईल, पण महाराष्ट्रातही शांतता नांदेल. नितीशकुमारांना आमच्या शुभेच्छा!
















