मुंबई (वृत्तसंस्था) MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यात एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. स्वप्नील लोणकर असं या तरुणाचं नाव आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला विनंती करणारं ट्विट केलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारकडे विनंती करत MPSC परीक्षा त्वरित घेण्यात याव्यात तसंच प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात, असं म्हटलंय.
आपल्या ट्वीटमध्ये रोहीत पवार यांनी परीक्षा घेण्यासोबतच तातडीने त्यांना नियुक्त्या देखील देण्याची विनंती केली आहे. “कोरोनामुळे स्थगित केलेली MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळे युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरीत घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात”, असं ट्वीट रोहीत पवार यांनी केलं आहे.
दरम्यान, स्वप्नील लोणकर यानं आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून मन हेलावून टाकणाऱ्या शब्दांत आपली कैफियत मांडली आहे. “MPSC मायाजाल आहे, यात पडू नका. येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओझं वाढत जातं. आत्मविश्वास तळाला पोहोचतो आणि स्वत: बद्दल शंका वाढत जाते. २ वर्षे झाली आहेत उत्तीर्ण होऊन आणि २४ वय संपत आलंय. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेलं कर्ज, खासगी नोकरी करून कधी ही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना! कोरोना नसता, सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या तर आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगलं असतं. हवं ते, ठरवलं ते प्रत्येक साध्य झालं असतं. मी घाबरलो, खचलो असं मुळीच नाहीये, फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता”, असं त्यानं आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
“नकारात्मकतेची ही वादळं कित्येक दिवस ही मनात होती. पण काही तरी चांगल होईल, या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे आयुष्य सुरू राहू शकेल, असं काहीच उरलं नाहीये. यांस कोणतीही व्यक्ती कारणीभूत नसून हा माझा सर्वस्वी निर्णय आहे. मला माफ करा! मला डोनेशन करून १०० जीव वाचवायचे होते, ७२ राहिले…. जमलं तर हे इतरांपर्यंत पोहोचावा, अनेक जीव वाचतील”.