नागपूर (वृत्तसंस्था) कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यक्रम हे रद्द करण्यात आले आहेत. तर काही कार्यक्रम हे ऑनलाईन पार पडत आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशन यंदा मुंबईत घेतलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र नागपूर कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशन नागपुरात घ्या, अशी मागणी नागपूर जिल्ह्यातील भाजप आमदारांनी केली आहे.
नागपुरात सात डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. पण कोरोनामुळे अधिवेशन होणार की नाही, याचा निर्णय सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे. पण सध्या नागपुरात अधिवेशनाची तयारी सुरु झाली आहे. कोरोनामुळे राज्य मोठ्या आर्थिक संकटात आहे. तरीही दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार निवासात रंगरंगोटी सुरु झाली आहे. नागपूर कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशन हे नागपुरात घ्या, अशी मागणी भाजप आमदारांनी केली आहे. नागपुरातील भाजप आमदार कृष्णा खोपडे, समीर मेघे, मोहन मते, प्रविण दटके यांनी याबाबतची मागणी केली आहे. कोरोनाची संपूर्ण खबरदारी घेऊन हे अधिवेशन नागपुरात घ्यावं, असेही भाजप आमदार म्हणाले. तसेच मुंबईत अधिवेशन घेण्याच्या हालचालीमुळे हे सर्व भाजप आमदार नाराज असल्याचंही बोललं जात आहे.
विशेष म्हणजे गेल्यावर्षी अधिवेशनासाठी आमदार निवासात रंगकाम करण्यात आले होते. त्यासाठी जवळपास पावणे दोन कोटींचा खर्च करण्यात आला होता. यंदाही यासाठी आठ कोटींचा खर्च करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता या आमदारांच्या मागणीवर राज्य सरकार काय निर्णय घेणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.
















