गोंदिया (वृत्तसंस्था) जमिनीचे फेरफार करून देण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यास चिखली येथील तलाठी कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. सुरेन मुन्ना मारगाये (३८, रा. अजुनी-मोरगाव) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.
तक्रारदार (२८, रा. नैनपूर, सडक-अर्जुनी) हे शेतकरी असून त्यांच्या वडिलांनी चिखली तलाठी कार्यालय अंतर्गत ग्राम नैनपूर शिवारात सर्वे क्रमांक ३३२ व ३३३ मधील ०.३४ व ०.५४ हे. आर शेती तक्रारदार व त्यांच्या वहिनींच्या नावे बक्षीस पत्र करून दिली आहे. बक्षीस पत्राची दुय्यम निबंधक कार्यालयात २६ सप्टेंबर रोजी नोंदणी करण्यात आली आहे. तक्रारदाराने बक्षिसपत्राची नोंदणी प्रत व फेरफाराबाबतचा अर्ज ३ ऑक्टोबर रोजी तलाठी कार्यालयात देऊन फेरफार करून देण्याची विनंती केली. यावर सुरेन मारगाये याने काम करून देण्यासाठी त्यांना तीन हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांना लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली.
तक्रारीची पडताळणी करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (१९ ऑक्टोबर) चिखली येथील तलाठी कार्यालयात सापळा लावला. यात आरोपी सुरेन मारगाये याने तीन हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारली. पथकाने त्यांना लाच घेताना रंगेहात पकडले. या प्रकरणी डुग्गीपार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक विलास काळे, पोनी अतुल तवाडे, पोनि उमाकांत उगले, सहायक फौजदार विजय खोब्रागडे, चंद्रकांत करपे, हवालदार संजय बोहरे, मंगेश कहालकर, नापोशि संतोष शेंडे, नापोशि संतोष बोपचे, अशोक कापसे, नापोशि प्रशांत सोनवाने, कैलाश काटकर, महिला शिपाई संगीता पटले, रोहिणी डांगे, चालक शिपाई दीपक बाटबर्वे यांनी पार पाडली.