पातोंडा ता.अमळनेर (प्रतिनिधी) येत्या 23 नोव्हेंबर पासून इ. ९ ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आज पातोंडा, रूंधाटी व दहिवद येथील इ. ९ वी ते १२ वीच्या शिक्षकांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली. यापैकी कुणीही पाॅझीटीव आढळून आले नाही. दरम्यान, विद्यार्थ्यांची देखील कोरोना चाचणी करावी अशी मागणी पालकांनी केली आहे.
सोमवार पासून वर्ग सुरू होणार असून विद्यार्थ्यांना मास्क वापरणे, पाण्याची बाटली घरून आणणे, ताप सर्दि खोकला असेल तर मुलांना शाळेत पाठवू नका अशा व इतर सुचना मुख्याध्यापक व वर्गशिक्षकांकडून देण्यात आल्या आहेत. यावेळी वैद्यकीय अधिकारी शिल्पा बोरसे यांनी देखील कोरोना प्रतिबंधात्मक उपाय व खबरदारी यावर उपस्थित शिक्षकांनामार्गदर्शन केले. घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्या विषयीचे संमतीपत्र पालकांकडून भरून घेण्यात येणार आहेत. परंतू पालकांकडून प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त होत आहे. ज्या प्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कोविड १९ अँटीजेन चाचण्या करण्यात येत आहेत. त्याच प्रमाणे शासनाने विद्यार्थ्यांची देखील कोरोना चाचणी करायला हवी अशा प्रतिक्रीया पालक वर्गातून उमटत आहेत. यामुळे संमतीपत्र भरून घेणा-या शिक्षकांना पालकांचा रोष पत्करावा लागत आहे.