जळगाव (प्रतिनिधी) ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करण्याचे अमिष दाखवित यावल येथील नंदकिशोर दत्तू भारुडे (वय ५२) या शिक्षकाची ७ लाख ६२ हजार रुपयांना ऑनलाईन गंडविले. ही घटना उघडकीस आल्यानंतर शिक्षकाने जळगाव सायबर पोलिस ठाण्यात एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
यावल येथील नंदकिशोर दत्तू भारुडे हे शिक्षक असून त्यांना दि. ३० मार्च रोजी एका ‘अपॉर्चुनिटी ग्रुप’मधून ट्रेडींगमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक अॅप डाउनलोड करण्यास सांगितले गेले. यानंतर, सौजन्या गिल नावाच्या एका महिलेने भारुडे यांना ‘व्हिआयपी ६५’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सहभागी करून घेतले. वेगवेगळ्या ट्रेडींग ग्रुपमध्ये सामील करून, ‘मोठा नफा मिळेल’ असे आमिष दाखवण्यात आले. चोरट्यांनी भारुडे यांचा विश्वास जिंकण्यासाठी युक्ती वापरत सुरुवातीला भारुडे यांनी भरलेले २ लाख रुपये त्यांना परत केले. ज्यामुळे त्यांचा विश्वास बसला की ही गुंतवणूक सुरक्षित आहे. यानंतर, भारुडे यांनी आपल्या वेगवेगळ्या बँक खात्यातून तब्बल ७ लाख ६२ हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने भरले. मात्र, अनेक दिवस उलटूनही पैसे मिळाले नाहीत, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सोमवारी नंदकिशोर भारुडे यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात जाऊन, सौजन्या गिल नावाच्या महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सायबर पोलिसांकडून सुरू आहे.
















