भडगाव (प्रतिनिधी) शहरातील इंग्लिश स्पिकींगचे ज्ञान देणाऱ्या अकॅडमीतील एका शिक्षकाने तीन विद्यार्थ्यांसोबत लैंगिक चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. हे तीनही विद्यार्थी तालुक्यातील एका गावातील असून २ विद्यार्थी नववी तर एक विद्यार्थी सातवीतील आहे. तर संबंधित विकृत शिक्षक ही तालुक्यातील असल्याचे समजते. दोन दिवसांपूर्वी हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र, पालक व संबंधित प्रमुख शिक्षकांमध्ये समझोता झाल्याने हे प्रकरण रात्री उशिरापर्यंत मिटवण्यात आल्याचे समजते.
आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, सोबतच इंग्रजीचे ज्ञान मिळावे. तसेच इंग्रजी लिहता, वाचता, बोलता यावे, यासाठी ग्रामीण भागातील पालक आपल्या मुलांना शहरात विविध क्लास लावतात. त्याप्रमाणे तालुक्यातील एका गावातील २० ते २५ विद्यार्थ्यांनी ही इंग्लिश स्पिकींगच्या कोर्सला अॅडमिशन घेतली आहे. शहरातील एका कॉलनी परिसरात असलेल्या व इंग्लिश बोलण्याचे शिक्षण देणाऱ्या नामांकित संस्थेत प्रवेश घेऊन हे विद्यार्थी इंग्रजीचे शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी तालुक्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत. हे तीघे विद्यार्थी सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान इंग्लिश स्पिकींगचे शिक्षण घेऊन दुपारी आपल्या शाळेत जातात. यात नववीच्या वर्गातील दोन व सातवीच्या वर्गातील एक विद्यार्थी आहे. इंग्लिश स्पिकींगचा कोर्समध्ये शिकवणाऱ्या एक विकृत शिक्षक हा या तिन्ही विद्यार्थ्यांसोबत लैंगिक चाळे करायचा. त्या विकृत शिक्षकाचा त्रास नेहमीचाच झाल्याने व सहनशिलते पलीकडे गेल्याने त्या विद्यार्थ्यांनी हा सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. या मुळे संतप्त झालेल्या पालकांनी ती संस्था गाठत संबंधित शिक्षकांना जाब विचारला. त्यावेळी संबंधित विकृत शिक्षकाने मी असं काही केले नाही, तुम्ही माझी बदनामी करत आहात, असे सांगितले. या वेळी संतप्त पालकांनी या अकॅडमीचे चालक, शिक्षकांना बोलावून त्यांच्याकडे तक्रार करत, पोलीस ठाणे गाठले. या वेळी संबंधित विकृत शिक्षकाचे आई, भाऊ यांना ही बोलावण्यात आले होते. अखेर संबंधित शिक्षकाने माफी मागितल्याने रात्री उशिरापर्यंत त्या शिक्षकाला सोडून देण्यात आले होते.