मुंबई (वृत्तसंस्था) राज्य सरकारनं मुंबई व उपनगरांत शाळेत शिकवणाऱ्या शिक्षक, शिक्षिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, शिक्षकांना लोकल ट्रेननं प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भातील राज्य सरकारनं मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे पत्र पाठललं आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.
शिक्षकांना लोकलमध्ये प्रवेशाची मुभा देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक व शिक्षक संघटनांकडून करण्यात येत होती. आता राज्य सरकारनं ही मागणी मान्य केली आहे. राज्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्याबाबत राज्य सरकारनं निर्णय घेतला आहे. तसेच शाळांमध्ये ५० टक्के उपस्थिती आणि त्यामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना शाळेमध्ये उपस्थित राहता यावे, यासाठी त्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. या संदर्भात राज्य सरकारनं मध्य व पश्चिम रेल्वेला निवेदन दिलं आहे. आता लवकरच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळण्याची शक्यता आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात मुंबईत सार्वजनिक वाहतूक बंद झाली होती. मात्र, लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर सार्वजनिक वाहतूक फक्त कोरोना योद्धयांसाठीच सुरू होती. मात्र अशाही परिस्थितीमध्ये उत्तरपत्रिका तपासणे, परीक्षांचे निकाल जाहीर करणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना तारेवरची कसरत करून शाळा गाठावी लागत होती. मुळे शिक्षकांना शाळेमध्ये येता यावे, यासाठी राज्य सरकारच्या आपत्कालिन व्यवस्थापन विभागाकडून मध्य व पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहिले आहे.