जळगाव (प्रतिनिधी) भागीदारीमध्ये मेडीकल चालविणारा नीरज प्रभाकर चव्हाण (मूळ रा. चहार्डी, ता. चोपडा, ह.मु. भुसावळ) हा तरुण बेपत्ता झाल्याची त्याच्या कुटुंबियांनी शनिवारी रात्री पोलिसात तक्रार दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत एमआयडीसी पोलिसांनी तपासचक्रे फिरवित आणि तांत्रिक विश्लेषण करीत तरुणाचा शोध घेतला. तो तरुण मध्यप्रदेशातील इंदौर येथे असल्याचे कळताच पथकाने तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या सहा तासात तरुणाला ताब्यात घेत जळगावात आणले. दरम्यान, मेडीकलमध्ये नुकसान झाल्यामुळे तरुणाने हा तरुण इंदौर येथे निघून गेल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे.
भुसावळ येथील नीरज याने त्याच्या इतर तीन सहकाऱ्यांसोबत भागीदारीमध्ये भुसावळ, जळगाव, चोपडा, धरणगाव याठिकाणी पाच मेडीकल टाकले होते. भुसावळातील मेडकील नीरज हा चालवित होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याला सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागत होते. त्यामुळे त्याच्या इतर भागीदार त्या मेडीकलमध्ये भागीदारी काढण्याचा निर्णय ते शनिवारी एकत्रीत मिळून घेणार होते. मात्र त्यापुर्वीच शुक्रवारी सायंकाळी जळगावातील एजन्सी बंद केल्यानंतर नीरज हा अजिंठा चौफुली परिसरातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर शनिवारी पहाटेच्या सुमारास नीरजचा मोबाईल आणि दुचाकी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मिळून आली होती.
भागीदारांना घाबविण्यासाठी गाठले इंदौर !
बेपत्ता झालेल्या नीरजला जळगावात आणल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. यामध्ये भुसावळ येथील मेडीकलमध्ये त्याला सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. भागीदार त्यामधील भागीदार काढणार असल्याने त्यांना घाबरविण्यासाठी नीरज हा अजिंठा चौफुली येथून ट्रकने मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुर येथे पोहचला. तेथून खंडवामार्गे तो इंदौरला पोहचल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिली.
घटनेचे गांभीर्य राखत फिरवली तपासचक्रे !
नीरजचा मोबाईल आणि दुचाकी मिळून आल्यामुळे त्याच्यासोबत अनुचित प्रकार घडला नसेल ना, या चिंतेत असलेल्या कुटुंबियांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासमोर आपबिती कथन केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तरुणाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार दुचाकी लावणाऱ्या हमालासह नीरजच्या भागीदारांना ताब्यात घेत चौकशी करण्यास सुरुवात केली.
नातेवाईकांना सोबत घेत गाठले इंदौर !
गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, राहुल रगडे, विशाल कोळी यांच्या पथकाने नीरज बेपत्ता होण्यापुर्वी तो कोणाच्या संपर्कात होता, यासह तांत्रिक विश्लेषण करण्यास सुरुवात केली. यामध्ये नीरज हा मध्यप्रदेशातील इंदौर येथे असल्याची माहिती मिळताच पोलिस नीरजच्या नातेवाईकांना सोबत घेत त्यांनी इंदौर गाठले. याठिकाणी तो नेमक्या कोणत्या हॉटेलमध्ये आहे याची माहिती नसतांना देखील पथकाने तांत्रीक विश्लेषणावरुन नीरजचा शोध घेतला. त्यानंतर इंदौरमधील एका हॉटेलमधून नीरजला पहाटेच्या सुमारास ताब्यात घेत त्याला रविवारी सायंकाळच्या सुमारास पथक त्याला घेवून जळगावात परतले.