मुंबई (वृत्तसंस्था) भारतात ग्रामीण भागाला जोडणाऱ्या पोस्ट खात्याकडून खात्याकडून १० पास मर्यादेवर काही जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी भारतीय पोस्ट खात्याने ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) भरतीसाठी (India Post GDS Recruitment) अधिसूचना जारी केली आहे. देशातील 35 राज्यांत एकूण 38,926 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
भारतीय पोस्ट खात्यातर्फे (Indian Post Department) देशभरातील विविध राज्यांमध्ये बंपर भरती सुरु आहे. याअंतर्गत दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी (Government Job) करण्याची संधी मिळणार आहे. भारतीय पोस्ट खात्याने ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) भरतीचे (India Post GDS Recruitment) नोटिफिकेशन जाहीर केले असून यामध्ये पदभरतीचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
देशभरातील एकूण ३५ राज्यामध्ये विविध पदांच्या एकूण ३८ हजार ९२६ रिक्त जागांवर ही भरती केली जाणार आहे. भारतीय पोस्ट खात्याने ग्रामीण डाक सेवक भरती अंतर्गत शाखा पोस्टमास्टर, सहायक शाखा पोस्टमास्तर आणि डाक सेवक ही पदे भरली जाणार आहेत. निवड समितीने तयार केलेल्या गुणवत्ता यादीवरही भरती केली जाणार आहे. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. गणित आणि इंग्रजी हे विषय अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून अभ्यास केलेले असावे. उमेदवारांनी आपल्या पसंतीनुसार पदांसाठी अर्ज पाठवायचा आहे. त्यानंतर गुणवत्ता यादीच्या आधारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाणार आहे.
१८ वर्षावरील आणि ४० वर्षाच्या आतील उमेदवार या रिक्त पदांसाठी अर्ज करु शकतात. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १० हजार ते १२ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
उमेदवारांनी आपला अर्ज २ मे ते ५ जून या कालावधीपर्यंत पाठवायचा आहे. indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अर्जाचा सविस्तर तपशील मिळू शकणार आहे. वेबसाइटवरील होमपेजवर ‘स्टेज 1 नोंदणी’ लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा. आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करुन नोंदणी फॉर्म भरा. अर्ज भरताना १०० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
 
	    	
 
















