गडचिरोली (वृत्तसंस्था) तुम्ही सर्वांनी अनेकदा कुत्र्यांच्या निष्ठेचे अनेक किस्से ऐकले असतील. असाच एक किस्सा नुकताच समोर आलाय. ज्यात कुत्र्याने आपल्या मालकाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावला आणि मालकावर प्राणघातक हल्ला केलेल्या अस्वलाला पळवून लावले.
शेतात काम करून सायंकाळी घरी परत येत असलेल्या मालकावर अस्वलाने हल्ला केला. हा प्रकार कुत्र्याने बघताच मालकाच्या दिशेने धावत अस्वलीच्या तावडीतून मालकाला वाचवल्याची घटना अहेरी तालुक्यातील भंगारामपेठा येथे २७ जुलै रोजी घडली. अहेरी तालुक्यातील भंगारामपेठा येथील संतोष पांडू वेलादी हा शेतकरी मुल्ला लच्चा गावडे व वेला वाघा वेलादी या शेतकरी मित्रासोबत गावापासून दीड ते दोन किमी अंतरावर असलेल्या शेतात गेले होते. यावेळी संतोष सोबत त्याचा कुत्राही होता.
शेतातील कामे आटोपून परत सायंकाळी घराकडे येत असताना घनदाट जंगलातून अस्वल आपल्या पिल्लांसह निघाले व अस्वलाने थेट संतोषवर हल्ला करणे सुरू केले. हा प्रकार पाहून संतोषचे दोघेही शेतकरी मित्र पळून एका झाडावर चढले. संतोषसोबत अस्वलाची झुंज सुरू असताना कुत्र्याने मालकाच्या दिशेने धाव घेत थेट अस्वलावर प्रतिहल्ला केला. कुत्र्याच्या हल्ल्याने अस्वल जंगलात पिल्लांसह पळून गेली. त्यामुळे खाल्लेल्या मिठाला जागले. अस्वलाच्या हल्ल्यात मात्र, संतोष गंभीर जखमी झाला. संतोषवर आलापल्ली येथील आरोग्य वर्धिनी येथे उपचार करून अहेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले.