वाराणसी (वृत्तसंस्था) येथील दाफी भागातील नॅशनल हायवे वरील हॉस्पिटॅलिटी हॉटेलजवळ दिवाळीला घरी जाणाऱ्या मजुरांनी भरलेली पिकअप उलटली. या अपघातात पिकअपमधील चार महिलांचा मृत्यू झाला. तर १९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पिकअपवरील लोक दिवाळी सण साजरा करण्यासाठी बरेलीहून बिहारमधील दौड नगर (औरंगाबाद) येथे जात होते. पिकअपमध्ये नऊ कुटुंबातील एकूण २५ जण होते. चालकाला डुलकी लागल्याने पिकअप दुभाजकाला धडकल्यानंतर पलटी झाल्याचे सांगण्यात येत आहे. आरडाओरडा होताच आजूबाजूचे लोक व रस्त्यावरून जाणारे लोक तेथे पोहोचले. अपघातग्रस्त पिकअपमध्ये अडकलेल्या लोकांची सुटका करून पोलिसांना कळविण्यात आले. लंका पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवले. तेथे डॉक्टरांनी चार महिलांना मृत घोषित केले. १९ जखमींवर उपचार सुरू आहेत. चार जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.