नंदुरबार (प्रतिनिधी) घराच्या छतावर भावडांसह खेळता-खेळता लोंबकळलेल्या वीजवाहक तारेला हात लागून शॉक बसल्याने स्वाती सतीश जगताप (वय ६, रा. वडाळी ता. शहादा) या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.
शनिवारी स्वाती आपल्या आतेभाऊ व बहिणीसह घराच्या छतावर खेळत होती. यावेळी खेळता खेळता एका उच्च दाब असलेल्या विद्युत तारेला स्वातीचा चुकून स्पर्श झाला. त्यामुळे स्वातीच जागीच कोसळली. कुटुंबीयांनी तिला तातडीने वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासणीअंती स्वातीला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे वडाळीसह परिसरात शोककळा पसरली होती. याप्रकरणी सारंगखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.