कोलकाता (वृत्तसंस्था) नवरात्रीत नरबळी दिल्यास अपत्यप्राप्ती होईल असं एका जोडप्याला तांत्रिकाने सांगितलं. त्याच्यावर अंधविश्वास ठेवत आरोपींनी एका सात वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार कोलकातामध्ये उघडकीस आला आहे.
बिहारच्या समस्तीपूर भागात राहाणारा आलोक कुमार याचं 2016 मध्ये लग्न झालं. त्यानंतर कामानिमित्ताने तो आपल्या पत्नीसह कोलकातामधल्या तिलजलामध्ये राहायला आला होता. लग्नाला अनेक वर्ष होऊन गेल्यानंतरही मुल होत नसल्याने आलोक आणि त्याची पत्नी नैराश्यात होते. आलोकने एकेदिवशी आपल्या शेजारच्यांना पत्नी गर्भवती असल्याचं खोटं सांगितलं. पत्नीवर कोणचाही संशय येऊ नये म्हणून तिला आलोकने आपल्या पत्नीला बिहारला पाठवून दिलं.
यानंतर कोलकाता इथल्या निमतला भागातील एका तांत्रिकाची माहिती मिळाली. आलोकने त्या तांत्रिकाला गाठलं आणि आपली समस्या सांगितवली. यावर त्या तांत्रिकाने आलोकला अघोरी सल्ला दिला. नवरात्रीच्या काळात सात ते आठ वर्षांच्या मुलीचा बळी दिल्यास अपत्यप्राप्ती होईल असं सांगितलं. आलोक राहात असलेल्या ठिकाणी एक मुलगी सकाळी सात ते आठ वाजण्याचा दरम्यान कचरा फेकण्यासाठी येत असल्याचं आलोकने पाहिलं होतं. त्यानंतर एकेदिवशी आलोकने त्या मुलीचं तोंड दाबलं आणि तिला उचलून आपल्या प्लॅटमध्ये आणलं. फ्लॅटमध्ये आणल्यावर आरोपीने त्या मुलीला एका गोणपाटात भरलं आणि त्यावर हातोड्याने अनेक वार केले. या हल्ल्यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. मुलगी हरविल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर थोड्याच वेळात पोलीस आलोकपर्यंत पोहचले. खाक्या दाखवताच अलोकने अपत्यप्राप्तीसाठी तांत्रिकाच्या सांगण्यावरून मुलीला ठार मारल्याचे कबुल केले.















