गुरुग्राम (वृत्तसंस्था) एका निर्दयी आईने नोकरी गेल्याने रागाच्या भरात आपल्या तीन वर्षाच्या मुलीचा जीव घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.
ही संतापजनक घटना हरियाणातील साढराणा येथील गणपती नगर कॉलनीत घडली. याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली असून तिला कोर्टासमोर हजर करण्यात आले. यानंतर महिलेची रवानगी भोंडसी तुरुंगात करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केल्यानंतर महिलेकडे चौकशी करण्यात आली. या चौकशीत तिने सर्व प्रकार सांगितला. ती एका खासगी रुग्णालयात नोकरी करत होती. जवळपास तीन महिन्यांपूर्वी तिची नोकरी गेली. तेव्हापासून ती घरीच होती. नोकरी गमावल्यानंतर तिची खूप चीडचीड व्हायची. किरकोळ गोष्टींवरून पतीसोबत तिचे वाद व्हायचे. तिला प्रचंड राग यायचा. पतीच्या पगारावर घर चालणे कठीण झाले होते. रागाच्या भरात तिने टोकाचे पाऊल उचलले. आपल्याच पोटच्या तीन वर्षाच्या मुलीची तिने गळा आवळून हत्या केली. ही घटना शनिवारी रात्री बाराच्या सुमारास उघडकीस आली. राजस्थानच्या भरतपूरमधील मूळ रहिवासी असलेला प्रदीप सध्या गणपती नगर कॉलनीत राहतो. सेक्टर ३३ मध्ये एका कंपनीत तो नोकरीला आहे. शनिवारी दुपारी पावणेदोन वाजताच्या सुमारास कंपनीत कामासाठी गेला होता. रात्री उशिरा बारा वाजता तो घरी परतला. त्यावेळी गेट आतून बंद होता. बराच वेळ वाट बघितल्यानंतर त्याने गेटला जोरात धक्का दिला आणि तो उघडला.
घरात गेला असता, पत्नी अत्यवस्थ होती. तर पलंगावर तिची तीन वर्षाची मुलगी बेशुद्धावस्थेत पडली होती. दोघींनाही रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. तिथे मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. महिलेवर उपचार सुरू होते. मुलीचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. महिलेला रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर तिला अटक केली असून कोर्टात हजर केले. पोलिसांनी या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू केली आहे.