कन्नड (वृत्तसंस्था) मुलीसोबतच्या प्रेम प्रकरणातून संतप्त नातेवाइकांनी २२ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून विहिरीत फेकून खून केल्याची खळबळजनक घटना कन्नड तालुक्यातील खातखेडा येथे सोमवारी रात्री घडली. नारायण रतन पवार असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीसह १८ नातेवाइकांविरुद्ध मंगळवारी पिशोर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कन्नड तालुक्यातील खातखेडा येथील नारायण पवार हा तरुण रविवारी सायंकाळी त्याच्या घरासमोर बसला होता. यावेळी एका सातवर्षीय चिमुकल्याने एक चिठ्ठी आणून त्याच्या घराच्या दरवाजात टाकली. आई, वडील व बहीण बसलेली असल्याने नारायण याने घरच्यांना ही चिठ्ठी दाखवली. गावातीलच १६ वर्षीय मुलीने पाठवलेल्या या चिठ्ठीत मला तुझी खूप आठवण येते. तुझे माझ्यावर प्रेम असेल तर मला दूर घेऊन चल यासह इतर मजकूर लिहिला होता. यावरून नारायण पवार याच्या आई-वडिलांनी सोमवारी (दि.७) सकाळी ही चिठ्ठी मुलीच्या आईवडिलांना दाखवली. मुलीला समोर बोलावून विचारले असता मी चिठ्ठी लिहिली नाही, असे मुलीने सांगितले. यावरून मुलीचे वडील राजेंद्र काकुळते यांनी नारायण पवार याला लाकडी दांड्याने मारहाण केली. यावेळी सर्वांनी समजावून भांडण मिटवून घेतले. रात्री ८ वाजेच्या सुमारास सर्व पवार कुटुंबीय घरी बसलेले असताना दरवाजा वाजला म्हणून नारायण पवार याने दरवाजा उघडला. दरवाजात उभा असलेल्या प्रवीण नारायण काकुळते याने नारायण यास बाहेर ओढले. नंतर सोबतच्या १७ ते १८ जणांनी काठ्या व दगडांनी नारायणला जबर मारहाण केली.
मुलाचे वडील रतन पवार, आई मीराबाई, बहीण गंगा हे सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण केली. मारहाणी दरम्यान प्रदीप काकुळते, राजेंद्र काकुळते, सचिन काकुळते व सचिन निकम यांनी नारायण यास उचलून नेऊन नदीतील विहिरीमध्ये फेकून दिले. परत घरी येऊन तरुणाच्या आई, वडील, बहीण व भाऊ कैलास यांना मारहाण करून धमकी देऊन निघून गेले. पोहता येत नसल्याने नारायण याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी त्यास ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीबाहेर काढून पिशोर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ. कोकणे यांनी तपासून नारायणला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मंगळवारी दुपारी त्याच्यावर कडक पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत मयत नारायणचे वडील रतन पवार यांच्या फिर्यादीवरून यतीन कारभारी काकुळते, प्रवीण नारायण काकुळते. शरद नारायण काकुळते, प्रदीप नारायण काकुळते, राजेंद्र नारायण काकुळते, सचिन कारभारी काकुळते, नारायण नामदेव काकुळते, कारभारी नामदेव काकुळते, सचिन निकम, कांताबाई नारायण काकुळते, मंजुळा राजेंद्र काकुळते, स्वाती प्रवीण काकुळते, रेखा प्रदीप काकुळते, योगिता सचिन काकुळते, पुनम यतीन काकुळते, निमाबाई कारभारी काकुळते, सीमा सचिन निकम यांच्यासह एका अल्पवयीन मुलीवर विविध कलमांन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आठ आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात आली असून त्यांना कन्नड न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने दिले आहे.