बीड (वृत्तसंस्था) माजलगाव तालुक्यातील लवुळ येथे वानरांनी मागील एक महिनाभरात २५० कुत्र्यांच्या पिलांना मारले असल्याचे लवुळवासीय सांगत असुन याकडे वनविभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहे. हे वानरं गावात असलेल्या कुत्र्यांची पिल्लं उचलून घेऊन जात उंच ठिकाणाहुन या पिल्लांना फेकुन देतात. परिणामी यातः पिल्लांचा जागीच मृत्यु होत आहे. आतापर्यंत या वानरांनी २५० कुत्र्यांच्या पिलांचा बळी घेतला आहे.
माजलगावपासून दहा किलोमीटर अंतरावर लवुळ हे पाच हजार लोकसंख्येचे गाव आहे. या ठिकाणी मागील एक महिन्यापासून ही वानरे कुत्र्यांची पिल्ले उचलून घेऊन जात आहेत. कुत्र्यांच्या पिल्लांना उंच झाडावर किंवा घरावर नेऊन त्या ठिकाणांवरून फेकून देत आहेत. आतापर्यंत या वानरांनी सुमारे २५० पेक्षा जास्त कुत्र्यांचा पिल्लांचा बळी घेतला असल्याचे गावकरी सांगतात. याबाबत येथील ग्रामपंचायतीने धारूर येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ते केवळ एक दिवस आले. थोडावेळ त्या वानरास पकडण्याचा प्रयत्न केला. पण वानर पकडता न आल्याने ते निघून गेले. त्यानंतर ते इकडे फिरकलेदेखील नाहीत.
कुत्र्यांनी मारले होते वानराचे पिल्लू
दरम्यान, या वानरांच्या एका गावातील कुत्र्यांनी काही दिवसांपूर्वी मारुन टाकले होते. यामुळे रागाच्या भरात ही वानरे गावातील कुत्र्यांच्या पिलांना मारून टाकत आहेत, असे येथील ग्रामस्थ सांगतात.