पुणे (वृत्तसंस्था) शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार (टीईटी) (TET Exam Scam) प्रकरणी आज पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) मोठी कारवाई केली आहे. कृषी विभागातील आयएएस अधिकारी सुशील खोडवेकरला ठाण्यातून अटक करण्यात आली असून, कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने खोडवेकर यांना ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
खोडवेकर यांनी शिक्षक भरती परीक्षेत घोटाळा केल्याची माहिती पुणे सायबर पोलिसांच्या हाती लागल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. आजवरची ही सर्वात मोठी कारवाई असल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आणखी कुणाकुणाचा सहभाग आहे. हा घोटाळा कसा झाला? याची माहिती खोडवेकर यांच्याकडून पोलीस काढणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे या घोटाळ्यात आणखी कोणते बडे मासे हाती लागतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, पोलिसांनी या घोटाळ्यातील खोडवेकर यांच्या सहभागाबाबतची विस्तृत माहिती देण्यात आलेली नाही.
पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी आज दुपारी सुशील खोडवेकर यांना ठाण्यातून अटक केली आहे. सुशील खोडवेकर हे २००९च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात उपसचिव म्हणून कार्यरत होते. सायबर पोलिसांनी शिक्षक भरती घोटाळ्याची पाळंमुळं खोदून काढण्यास सुरुवात केली असून खोडवेकर यांना अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आज पर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांना आज दुपारीच पुण्यातील शिवाजी नगर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना ३१ जानेवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
अटक सत्र सुरूच राहणार
टीईटीमध्ये ७८०० अपात्र उमेदवार पात्र ठरवल्याची माहिती तपासात समोर आली आहे. यामुळे आणखी लोकांना यामध्ये अटक होणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणात वेगवेगळया ठिकाणाहून आतापर्यंत ४० आरोपीना अटक करण्यात आली आहे. यामधील काहीआरोपी यातील काही आरोपी हे म्हाडा, आरोग्य भरतीमध्येही सहभागी आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत काही पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने कर्मचारी कामावर नव्हेत. त्यामुळे तपासही थंडावला होता. मात्र पुन्हा तपासाची चक्रे वेगवान झाली आहेत.