जळगाव (प्रतिनिधी) शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam Scam) गैरव्यवहारात चाळीसगावातील शिक्षक एजंट स्वप्नील तिरासिंग पाटील याला अटक झाली आहे. या शिक्षकाकडून अनेक धागेदोरे हाती लागतील आणि या प्रकरणातील इतर मासेही गळ्याला लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, चाळीसगाव शहरातील महाविद्यालयातही अशा एजंटांचा शिरकाव झाल्याचे बोलले जात आहे.
टीईटी प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी धावपळ
टीईटी बाेगस प्रमाणपत्रांच्या चाैकशी प्रकरणी राज्यातील सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची शिक्षण विभागाकडून पडताळणी केली जात आहे. सन २०१३ नंतर सेवेत रूजूू झालेल्या शिक्षकांची कागदपत्रे मागवण्यात आली हाेती. त्यात शुक्रवारीही जिल्हाभरातून अनेक शिक्षकांनी कागदपत्रे सादर केली. त्यात दाेन दिवसांची मुदत वाढवून मिळाल्याने उशिरा कागदपत्रे सादर करणाऱ्यांना शिक्षकांना दिलासा मिळाला. जिल्ह्यात अडीचशेवर अधिक शिक्षकांनी गुरुवारी टीईटी उतीर्ण असल्याचे प्रमाणपत्र शिक्षण विभागाकडे सादर केले हाेते. शुक्रवारी प्राथमिक विभागाकडे २० शिक्षकांनी प्रमाणपत्रे आणि अन्य कागदपत्रे सादर केली. गुरूवारी सायंकाळी सादर केलेली कागदपत्रे शिक्षण संचालक कार्यालय पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. यातील एक आराेपी हा चाळीसगाव येथील असल्याने खळबळ उडाली हाेती. अटकेतील शिक्षक स्वप्निल तिरसिंग पाटील (रा. शिक्षक कॉलनी, धुळेरोड, चाळीसगाव) हा नांदगाव तालुक्यातील अमोदे येथे जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहे. त्याच्या पत्नीचे टीईटी प्रमाणपत्रही त्याने याच पद्धतीने मिळविले आहे.
टीईटी प्रकरणातील शिक्षक स्वप्नील पाटील अनेकांच्या होता संपर्कात
चाळीसगाव शहरातील महाविद्यालयातही अशा एजंटांचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. टीईटी परीक्षेचा निकाल लागल्यावर संशयित स्वप्नील पाटील नापास झालेल्यांशी संपर्क साधत होता. एका वेळी तो जवळपास १० परीक्षार्थींची यादी तयार करायचा. प्रत्येकी १ लाख ते दीड लाखांची रक्कम त्याने उकळल्याचे समोर आले आहे. हे सर्व पैसे आणि परीक्षार्थींची यादी तो धुळे व पाचोरा येथील एजंटकडे पाठवत होता. संशयित पाटील २०१६ पासून या प्रकरणात गुंतला होता. तो दररोज शिक्षकांना याबाबत विचारपूस करत होता. अनेक संस्था चालकांशीदेखील त्याने याबाबत संपर्क साधला होता.
परीक्षेत गुणही वाढवले
शिक्षकांना विश्वासात घेऊन तो रक्कम ठरवत असे. त्याने चाळीसगाव तालुक्यात अनेक शिक्षकांना व परीक्षार्थींना बोगस टीईटी प्रमाणपत्र मिळवून दिल्याने त्याचा रुबाब वाढला होता. त्याला सर्वजण ‘साहेब’ या नावाने ओळखत होते, अशी माहिती समोर आली आहे. चाळीसगावात धुळे रोडवरील शिक्षक कॉलनीत संशयिताचे टोलेजंग घर असून बागायती शेतीदेखील आहे. त्याच्याकडे दुचाकी आणि चारचाकी वाहने आहेत. त्याने अनेक परीक्षार्थींना बोगस टीईटी प्रमाणपत्र मिळवून दिले. शहरातील एका नामांकित संस्थेत एकाचवेळी ६० शिक्षकांची भरती झाली होती. तेथील शिक्षकांना त्यानेच बोगस प्रमाणपत्र मिळवून दिले होते. तसेच ज्यांना कमी गुण मिळाले, त्यांचे गुण वाढवण्याचे कामही संशयिताने केल्याचे बोलले जात आहे.
बोगस टीईटी प्रमाणपत्रांसाठी एजंटांची टोळीच कार्यरत
चाळीसगाव तालुक्यातील अनेक शिक्षण संस्थामधील काही दलाल शिक्षकांकडून तालुक्यात अनेक बोगस प्रमाणपत्रे दिले असण्याची चर्चा तालुक्यात होती. त्यासाठी काही शिक्षक एजंटची टोळी ही कार्यरत होती. अनेक शिक्षक एजंटचा सहभाग असल्याशिवाय एवढे मोठे प्रकरण होऊ शकत नाही, अशी चर्चा आहे. याप्रकरणात अनेकांची नावे घेतली जात आहे. या व्यवसायातून एजंटांच्या टोळीने चाळीसगाव शहरात टोलेजंग इमारती बांधल्या आहेत. तसेच विविध ठिकाणी जमिनी व शेती खरेदी केल्याची आज दिवसभर चर्चा होती. ही दलालांची टोळी आपला विकेण्ड मोठमोठ्या रिसॉर्टवर साजरा करीत होते.
बोगस प्रमाणपत्रासाठी ४० ते ५० हजार पर्यंतच मागणी
मुख्य आरोपी सुपे याचेकडून बोगस प्रमाणपत्रासाठी ४० ते ५० हजार पर्यंतच मागणी होत होती मात्र ते बोगस टीईटी प्रमाणपत्रे चाळीसगाव तालुका व परिसरांपर्यंत येत येत २ लाखाच्या जवळपास विकले जात होते. तसेच पात्र टीईटी उमेदवारांच्याच बैठक क्रमांकावरुन बोगस प्रमाणपत्र दिली जात होती.