पुणे (वृत्तसंस्था) शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam) घोटाळ्यातील आरोपी जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचे संचालक प्रितिश देशमुख (Pritish Deshmukh) याला पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पन्नास हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. याबरोबरच देश सोडून कुठेही जाऊ नये व पुराव्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा फेरबदल न करण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
सन २०१७-१८ मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक भरती घोटाळ्यात जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक प्रितिश दिलीपराव देशमुख यास पुणे सत्र न्यायालयाने जामिनावर मुक्त केले आहे. न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी हा निर्णय दिला आहे. सन २०१७-१८ मध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे शिक्षक भरतीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. सदर परीक्षेचे संचालनाचे काम हे जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीस देण्यात आले होते.
सदर कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपापसात संगनमत करून अपात्र उमेदवारास पात्र म्हणून घोषित करून तसा निकाल जाहीर केल्याचा आरोप प्रितिश देशमुखवर आहे. प्रकरणाची उघड झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी पुणे सायबर पोलीस स्टेशन येथे सदर प्रकरणाबाबत फिर्याद दिली होती. या प्रकरणात संचालक प्रितिश देशमुख यास दिनांक २२/१२/२०२१ रोजी अटक करण्यात आली होती. प्रीतिश देशमुख याची रु. ५०,०००/- रक्कम रुपयाचे जातमुचलक्यावर सुटका केलेली आहे. तसेच त्यावर देशाबाहेर न जाण्याची व पुराव्यात छेडछाड न करण्याची व इतर बंधने लादण्यात आलेली आहे.