पुणे (वृत्तसंस्था) टीईटी परीक्षा घोटाळ्यासह म्हाडा पेपर फुटीप्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आणखी तीन दलालांना अटक केलीय. संबंधित एजंटांनी उमेदवारांकडून कोटय़वधींची माया गोळा करून वाटून घेतल्याचे उघड झालंय. पुणे पोलिसांनी नाशिक, बुलडाणा आणि लातूर परिसरात छापे मारून दलालांना अटक केली आहे.
पुणे पोलिसांच्या सायबर विभागानं नाशिक, बुलढाणा, लातूर परिसरात छापे मारून दलालांना अटक केलीय. त्यामुळे टीईटीसह म्हाडा पेपर फुटीप्रकरणातील आणखी आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता आहे. मुकुंदा जगन्नाथ सूर्यवंशी (वय ३३, रा. नाशिक), कलीम गुलफेर खान (वय ५२, रा. बुलढाणा), जमाल इब्राहिम पठाण (वय 4४०, रा. लातूर) अशी अटक केलेल्या दलालांची नावे आहेत. टीईटी २०१८ मध्ये आरोपी मुकुंदा सूर्यवंशी याने अपात्र उमेदवारांना पात्र करण्याचे आमिष दाखवून तब्बल ८० लाख रुपये एजंट हरकळ बंधूंना दिल्याचे सांगितलं आहे. तर, त्याशिवाय २०१९ च्या टीईटी परीक्षेत १ कोटींवर रक्कम पोहोच केली आहे.
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणातील पैशाचं वाटप कसं
डॉ.प्रीतिश देशमुख आणि अभिषेक सावरीकर यांच्या सांगण्यावरून अश्विनकुमार शिवकुमार याला ५ कोटी ३७ लाख रुपये देण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. तर, या पाच कोटी रुपयांपैकी २ कोटी रुपये जीएस सॉफ्टवेअरचा संस्थापक गणेशन याला देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत अधिकारीपदावर कार्यरत असलेल्या तुकाराम सुपे आणि सुखदेव डेरे यांना देखील पैसे देण्यात आल्याचं समोर आलंय.
नाशिक, जळगाव, जालना, बुलडाणा जिल्ह्यातील पाच एजंटाकडून पैसे जमा केलेत
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले एजंट संतोष हरकळ व अंकुश हरकळ यांनी नाशिक, जळगाव, जालना, बुलडाणा जिल्ह्यातील पाच एजंटाकडून हे पैसे जमा केले होते. त्यानंतर डॉ. देशमुख आणि सावरीकर यांच्या सांगण्यावरून ते अश्विनीकुमार याला देण्यात आले.