मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सर्वसामान्यांसह दुकानदारांना मोठा दिलासा देणारे मोठे पाऊल उचलत आहेत. सांगली दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी महत्वाची घोषणा केली आहे. ज्या झोनमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी आहे, अशा झोनमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसा अध्याधेशही आज काढला जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
राज्यातील जनतेला लॉकडाऊनमधून दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करत असून राज्यातील दुकानं रात्री8 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील, असे संकेत त्यांनी दिले आहेत. ज्या भागात कोरोना रुग्णांची टक्केवारी कमी आहे, त्या भागात हा निर्णय लागू होणार आहे. ज्या भागात कोरोनाची रुग्णसंख्या अधिक आहे, तिथे मात्र निर्बंध कायम राहतील, असं त्यांनी सांगितलं.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, आपत्तीग्रस्तांना तत्काळ मदत देणं सुरू झालंय, कायमस्वरूपी तोडगा करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. लाखो लोकांचं स्थलांतर करण्यात प्रशासनाल यश आलं आहे. कमी कालावधीत जास्त पाऊस पडल्याने आपत्ती ओढावली आहे. काही वस्त्यांचं पुनर्वसन आवश्यक, नागरिकांनी यामध्ये सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे. निसर्गासमोर आपण हतबल आहोत. असं देखील सांगितलं. सांगलीतील पूरग्रस्त भागांचा मुख्यमंत्र्यांनी आज आढावा घेतला. यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
याचबरोबर, ”मी दोन-चार दिवसांपासून सर्वांना सांगतोय की काही ठिकाणी काही प्रसंगी कठोर निर्णय हे आपल्याला घ्यावे लागतील. याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत आपण आपली कामं, ज्याला आपण विकास कामं म्हणतो ती करत गेलो. पण ही आता आपत्ती आणि आपत्तीची वारंवारता जर आपण पाहिली, तर आपत्तीचं स्वरूप हे अधिकाधिक भीषण होत चाललेलं आहे. काही दिवसांचा काही महिन्यांचा पाऊस हा काही तासांत किंवा एक दिवसात पडायला लागलेला आहे. प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी होते आहे. दरडी कोसळत आहेत, रस्ते खचत आहेत.” असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं.