माथेरान (वृत्तसंस्था) माथेरानमध्ये एका लॉजमध्ये झालेल्या महिलेच्या हत्येचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. महिलेच्या पतीनेच चारित्र्याच्या संशयावरुन तिची हत्या करुन शीर कापल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. संशयिताने पत्नीचे शिर कापून ते दरीत फेकून दिले होते.
यासंदर्भात अधिक असे की, रविवारी माथेरानमधील इंदिरा नगर येथील एका लॉजमध्ये इंजिनियर असलेला उच्चशिक्षित पती राजीव पाल हा मुंबई गोरेगावहून पत्नीला घेऊन आला. रात्री त्याने पत्नीची हत्या करून तिचे शिर धडावेगळे करत ते माथेरानच्या दरीत फेकले होते. पोलिसांना रविवारी रात्री एका स्त्रीचा नग्न अवस्थेत शीर नसलेला मृतदेह आढळून आला होता. पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी माथेरान गाठून तपासाची सूत्रे हाती घेतली होती. या परिसरातील संपूर्ण दर्या, डोंगर येथे शोध मोहिम घेतली. यावेळी खोल दरीत एक रक्ताचे डाग असलेली लेडीज पर्स आढळून आली आणि ह्या पर्समुळेच खूनाचा उलगडा झाला.
या पर्समध्ये एक चिठी सापडली होती. ज्यामध्ये दादर येथील मेडिकल स्टोअरचा उल्लेख होता. पोलिसांनी हा धागा पकडून तपासास सुरवात केली असता या खूनाची लिंक लागली. गोरेगाव-मुंबई येथे एक महिला हरवली असल्याची तक्रार पोलिसांना सापडली.