जळगाव (प्रतिनिधी) तीन सुवर्णपढ्यांमध्ये चोरी केल्यानंतर ती चोरटी महिला शहरातील नवीपेठेतील महावीर ज्वेलर्समध्ये गेली. परंतू याठिकाणी हातचालाखी करुन देखील चोरीचा प्रयत्न फसत असल्याचे लक्षात येताच, ती चोरटी महिला तेथून पसार झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
शहरातील आर. सी. बाफना, भंगाळे ज्वेलर्स व पु. ना. गाडगीळ या सुवर्ण पेढीत एकाच दिवशी सोन्याची अंगठी चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही महिला दालनात ग्राहक म्हणून शिरल्यानंतर ती सोन्याची अंगठी खरेदी करायची असल्याचे सांगत अंगठ्या दाखविण्यास सांगते. सुरुवातीला ही महिला आवडलेली अंगठी बोटात घालून त्या ठिकाणी नकली अंगठी ठेवून तीन शोरुममधून तीने साडेचार लाख रुपयांच्या अंगठया चोरुन नेल्या. याप्रकरणी शनिपेठ व जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून तीचा कसून शोध घेतला जात आहे.
अनेक शहरात महिला ठगाविरुद्ध गुन्हे दाखल
तिन्ही सुवर्ण पेढीतून अंगठी चोरणारी महीला एकच असल्याचे निष्पन्न होताच एलसीबीचे पथक महिलेच्या शोधार्थ रवाना झाले आहे. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या महिलेला निष्पन्न केले. ही महिला मध्यप्रदेशातील असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. तसेच चोरट्या महिलेविरुद्ध अनेक ठिकाणी गुन्हे देखील दाखल आहेत.
४०० ते ५०० किमीची शहरे टार्गेटवर
मध्यप्रदेशात राहणारी ही चोरटी महिला तेथून चार ते पाचशे किमी अंतरावर असलेले शहरे टार्गेट करीत असल्याचे उघड झाले आहे. चोरी केल्यानंतर ही महिला तात्काळ घटनास्थळहून पोबारा करते. तीने अशाच पद्धतीने अनेक सुवर्ण व्यवसायीकांना गंडविल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
चोरीचा प्रयत्न फसल्याने घेतला काढता पाय
शहरातील तिघ नामांकीत सुवर्णपढीत गंडा घातल्यानंतर ती महिला शहरातील महावीर ज्वेलर्स या शोरुममध्ये गेली. याठिकणी सेल्समनने तीला अंगठ्या दाखविल्यानंतर तो त्या महिलेला आवडेल तोच बॉक्स उघडून तीच अंगठी तिच्या हातात देत होता. या महिलेने याठिकाणी देखील हातचालाखी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सेल्समनच्या चालाखीमुळे तीचा महावीर ज्वेलर्समध्ये चोरी करण्याचा प्रयत्न फसत असल्याने त्या चोरट्या महिलेने तात्काळ तेथून काढता पाय घेतला.
ती महिला सराईत गुन्हेगार
अंगठी विकत घेण्याच्या बहाण्याने महिला शहरातील नामांकीत सराफांच्या दुकानातून हातचालाखी करीत ही महिला ठग नकली अंगठ्या ठेवून सोन्याच्या अंगठ्या चोरुन नेत असल्याचे उघड झाले आहे. या महिलेविरुद्ध अनेक मोठ्या शहरांमध्ये गुन्हे दाखल असून ती सराईत गुन्हेगार आहे. या चोरटी महिला निष्पन्न करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून ती महिला मध्यप्रदेशातील असून पथक तिचा कसून शोध घेत आहे.
















