धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील पी.आर.हायस्कूलच्या १९९७ च्या बॅचने आजचे चंद्राचे वाहन घेतले आहे. त्यामुळे पी.आर.हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी या वाहनोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
धरणगावच्या इतिहासात प्रथमच आपल्या पी.आर.हायस्कूलच्या नावाने माजी विद्यार्थ्यांनी आज शुक्रवार दिनांक ७ ऑक्टोबरचे श्री बालाजी वाहन मंडळाच्या चंद्राचे वाहन घेतले आहे. धरणगावचा हा लोकोत्सव म्हणजे गावचा सांस्कृतिक परंपरेचे जतन करणे होय. शाळेनेही या उज्ज्वल परंपरेचे स्वागत केले आहे.आजही गाव आणि परिसरातील प्रत्येक घरी माजी विद्यार्थी आहेत. या सर्व माजी विद्यार्थ्यांनी या वाहनोत्सवात सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.
या वाहनाचे सारथ्य पी.आर.हायस्कूलच्या छोट्या छोट्या गुणी मुली करणार असून मुलींचे लेझीम पथक आणि मुलांचे ढोल पथक मिरवणुकीत सहभागी होत आहे. याशिवाय पी.आर.हायस्कूल सोसायटीचे पदाधिकारी तथा संचालक मंडळ आणि शाळेचे सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग पूर्णपणे सहभागी होऊन या लोकोत्सवाचा आनंद लुटणार आहेत.
शाळेचे माजी गुणवंत विद्यार्थी तथा विक्री व कर विभागाचे आयुक्त विशाल मकवाने, समितीचे अध्यक्ष निलेश बयस, उपाध्यक्ष चंदनदादा पाटील, प्रताप महाविद्यालयाचे प्रा. रवींद्र मराठे, ज्ञानेश्वर चौधरी,दिपक केले, सुशीलभाई कोठारी आणि १९९७ च्या दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थ्यांनी हा मान शाळेला देऊ केला आहे. याबद्दल या सर्वांविषयी आत्मीयतेची आणि स्नेहाची भावना मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, उपमुख्याध्यापिका डॉ. आशा शिरसाठ तसेच पर्यवेक्षक कैलास वाघ यांच्यासह पी.आर.हायस्कूलच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने व्यक्त केल्या आहेत.