भुसावळ ( प्रतिनिधी ) : भुसावळ तालुक्यातील साकरी गावात २७ जानेवारी रोजी दोन अल्पवयीन शाळकरी मुलींच्या निघृण हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात भीती, संताप आणि शोककळा पसरली आहे. अत्यंत अमानुष पद्धतीने करण्यात आलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे समाजमन हादरले असून, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साकरी गावातील दोन अल्पवयीन मुली नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्यावेळी एका व्यक्तीने (काही प्राथमिक अहवालांनुसार युवकाने) ‘मी तुम्हाला शाळेत सोडतो’ असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना दुचाकीवर बसवले. त्यानंतर त्यांना निर्जनस्थळी नेऊन विहिरीत ढकलून क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन्ही मुलींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले असून, शवविच्छेदनासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहेत.
या प्रकरणी भुसावळ पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत एका संशयिताने मुलींना विहिरीत ढकलल्याची कबुली दिल्याची माहिती आहे. भुसावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गंभीर आणि कठोर
कलमांखाली तपास सुरू आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून, संतप्त नागरिकांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यातून सोडवून स्वतःच शिक्षा देण्याचा प्रयत्न केल्याचेही समजते.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ भुसावळ येथील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्ष सौ. रजनी संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात ही घटना अत्यंत अमानुष, क्रूर आणि मानवतेला काळीमा फासणारी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आरोपी अल्पवयीन असले तरी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता त्यांच्यावर सज्ञान आरोपीप्रमाणे कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा भविष्यात अशा विकृत प्रवृत्तींना आळा बसणार नाही, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर उपाध्यक्ष सुनंदा भारुले, अर्चना सोनवणे, लता सोनवणे, अलका भटकर यांच्यासह अनेक महिला सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच सकल लेवा समाजाच्या वतीनेही या हत्याकांडाचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे.
या घटनेनंतर महिलांमध्ये व पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना तीव्र झाली असून, महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदेशीर उपाययोजनांची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, भुसावळ शहरातील सर्वपक्षीय नागरिकांनी दोन मिनिटे मौन पाळून मृत मुलींना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, उपनगराध्यक्षा शैलैजा नारखेडे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.















