मुंबई (वृत्तसंस्था) कुणी केलं मनी लाँड्रिंग, ७ हजार कोटी रुपयांपैकी साडे तीन हजार कोटी हे महाराष्ट्रातून गेली. महाराष्ट्रात जो घोटाळा, भ्रष्टाचार झाला त्यातून हे झाले. महाराष्ट्रात सर्वात मोठा घोटाळा आहे तो फडणवीस सरकारच्या काळातला असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
पाच वर्षात दुधवाला, ७ हजार कोटीचा मालक कसा बनतो?
मला कुणीतरी म्हटलं की, तुम्ही जिथे कपडे शिवले तिथेही गेले. ईडी हा काय प्रकार आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो. टेलरकडेसुद्धा हे लोक गेले, किती पैसे दिले, किती सुट दिले. आता फक्त चप्पल वाल्याकडे जायचं बाकी राहिलंय. तुम्ही कुठेही जा पण सामना शिवसेनेशी आहे. एक दुधवाला आहे हरयाणाचा, एस नरवल, मी विचारतो ईडीला की तुम्ही त्याला ओळखता का, फक्त पाच वर्षात दुधवाला, ७ हजार कोटीचा मालक कसा बनतो, कुणाचा पैसा? जेव्हापासून महाराष्ट्रात भाजपचं सरकार आलं. तेव्हापासून महाराष्ट्रात येणं जाणं सुरु झालं. भाजपच्या नेत्यांच्या घरात येणं जाणं सुरु होतं आणि त्याची संपत्ती वाढली. कुणी केलं मनी लाँड्रिंग, ७ हजार कोटी रुपयांपैकी साडे तीन हजार कोटी हे महाराष्ट्रातून गेली. महाराष्ट्रात जो घोटाळा, भ्रष्टाचार झाला त्यातून हे झाले. महाराष्ट्रात सर्वात मोठा घोटाळा आहे तो फडणवीस सरकारच्या काळातला असल्याचं संजय राऊत म्हणाले.
२०२४ नंतर काय करायचं बघू
मुलीच्या लग्नाच्या खर्चाच्या हिशोबाला हे लोक लागले. हारवाले, मंडपवाले, मेहंदीवाल्याकडे गेले. किती पैसे दिले अशी विचारणा केली. गुजरातमध्ये इतका घोटाळा झाला त्याचं काहीच केलं नाही. भाजपच्या एका मंत्र्याच्या मुलीचं लग्न झालं. त्यात जंगलाचा सेट केला. त्यात कार्पेट टाकलेलं त्याची किंमत साडेनऊ कोटी होती. घरात शिरायचं नाही, पण तुम्ही आमच्या घरात शिरताय, मुलांच्या, नातेवाईकांच्या घरात शिरताय. जेलमध्ये टाकणार आहात, टाका… पण माझ्यासोबत तुम्हीही असणार आहात, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
पहाटे चार वाजता गरीब लोकांना ईडीच्या कार्यालयात आणून बसवलं
माझ्या आय़ुष्यात कधीच चुकीचं काम केलं नाही. २० वर्षांचे स्टेटमेंट घेऊन गेले. ईडीचा तपास गंमतीचा आहे. माझं गाव अलिबाग, माझी जमिन अलिबागला असेल ना, मॉरिशिअसला नसेल ५० गुंठे जमिनीचा तपास ईडी करतंय. ५० गुंठे जमिनीसाठी ईडीच्या लोकांनी तिथल्या गावात नातेवाईकांना पहाटे चार वाजता गरीब लोकांना ईडीच्या कार्यालयात आणून बसवलं, संजय राऊतांच्या विरोधात लिहून दे, तुला किती कॅश दिली असं त्यांना धमकी दिली. गरीब लोक घाबरतायत ते, १२ – १४ तास त्यांना बेकायदा डांबून ठेवलं. कोणत्या कायद्याने कोणता तपास करताय. ५० गुंठे जमिनीचा तपास करताय? किती तपास पडलाय ईडीसमोर, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
पत्रकारांची पिकनिक काढू
त्यांनी जे आरोप केले आहेत, की आमचे १९ बंगले आहेत. आपण ४ गाड्या करून त्या १९ बंगल्यांमध्ये पिकनिकला जाऊ, पत्रकारांची पिकनिक काढू जर तुम्हाला ते बंगले तिकडे दिसले तर मी राजकारण सोडेन, दिसले नाहीत तर अख्खी शिवसेना जोड्याने मारेल. दिशाभूल, खोटेपणाचा कळस, भंपकपणा करायचा कशासाठी, चला दाखवू त्यांना लोकांच्या मनात भ्रम निर्माण करायचा. मराठी माणसाचा द्वेष, महाराष्ट्राविषयी असूया, हायकोर्टात सोमय्यांनी मराठी भाषा मुंबईतून, शालेय शिक्षणात सक्तीची असू नये यासाठी धाव घेतली होती. त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची, आणि मुंबईत मराठी कट्टा चालवतात, असंही राऊत म्हणाले.