मेरठ (वृत्तसंस्था) मंगळवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये झेंडावंदनानंतर हम दो हमारे पाचचा संकल्प करण्याचे आवाहन भाजप नेत्याने जनतेला केले. भाजपच्या व्यापार विभागाचे उत्तर प्रदेशमधील संयोजक असणाऱ्या विनीत अग्रवाल शारदा यांनी हे आवाहन केले आहे. त्याचबरोबर मुलांना हत्यारे विकत घेणे आणि ती चालवणेही शिकवले पाहिजे, असेही त्यांनी आपल्या भाषणात म्हटले.
जोपर्यंत कुटुंब नियोजनासंदर्भातील नियम बनवला जात नाही तोपर्यंत आपण हम दो हमारे पाचचा संकल्प केला पाहिजे. तसेच आपण जोपर्यंत कुटुंबनियोजनाचा ठोस नियम तयार होत नाही तोपर्यंत हम दो हमारे दोचा सिद्धांत संपवला पाहिजे असा युक्तीवादही शारदा यांनी केला. यावेळेस शारदा यांनी सरकारलाही आवाहन करताना, आमचे दोन त्यांचेही दोनचा नियम करावा किंवा हम दो हमारे पाचचा संकल्प करावा, असं म्हटलं आहे. शारदा यांनी या पाच मुलांना काय काम देण्यात यावं यासंदर्भातही आपल्या भाषणामध्ये भाष्य केलं. या पाच मुलांपैकी सर्वाधिक शिकलेल्या मुलाला राजकारणात पाठवावं. एका मुलाला मान, मर्यादा आणि प्रतिष्ठेचे संरक्षण करण्यासाठी हत्यार खरेदी करणं आणि ते चालवणं शिकवावं. एका मुलाला भारतीय लष्करात पाठावे. एकाला व्यापारी करावं आणि एका मुलाला आयएएस किंवा पीसीएस बनवून भारतीयांच्या सेवेसाठी सक्षम करावं, असं शारदा यांनी म्हटलं आहे. आज लोकशाहीसाठी अत्यंत पवित्र दिवस असून आजच्याच दिवशी सरकारने सर्वांसाठी हम दो हमारे दोचा नियम बनवावा किंवा आजपासून आपण सर्वांनी हम दो हमारे पाचचा संकल्प अंमलात आणावा, असंही शारद आपल्या भाषणात म्हणाले.