संगमनेर (वृत्तसंस्था) अहमदनगर जिल्ह्यात एका विहिरीत आईसह तीन लहान मुलांचे मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहांमध्ये तीन लहान मुलांमध्ये दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा गावात ही घटना घडली आहे.
संगमनेर तालुक्यातील खांगेदरा गावात असलेल्या विहिरीत शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास विहिरीत चार मृतदेह तरंगताना आढळून आले. चार मुलांमध्ये 28 वर्षीय आई स्वाती ढोकरे, पाच वर्षीय मुलगी भाग्यश्री, साडे तीन वर्षीय मुलगी तन्वी आणि सहा महिन्यांचा मुलगा शिवम यांचा समावेश आहे. दरम्यान, मृतक महिलेचा पती लग्नसोहळ्याला परगावी गेला होता. तर सासरे शेतावर गेले होते. ज्यावेळी सासरे दुपारी जेवणासाठी घरी आले तेव्हा घरात कुणीच नव्हतं. त्यामुळे त्यांनी सून आणि नातवंडांचा शोध सुरू केला. घराच्या जवळच असलेल्या विहिरीत पाहिल्यावर त्यांना एकच धक्का बसला. दरम्यान, ही आत्महत्या आहे की घातपात आहे?, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. घारगाव पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे.