जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील सावखेडा शिवारात कुजलेल्या अवस्थेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. येथील एका शेताच्या कडेला हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. त्यानंतर जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, पिंप्राळा परिसरातील रहिवासी एकनाथ पांडुरंग घायदार (वय ७०) यांचे सावखेडा शिवारात गट नं येथे आर्यन पार्कच्या मागील बाजूस गट नं २७५ येथे शेती आहे. एकनाथ घावदार शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे शेतात गेले असता त्यांना शेतात एका बाजुला अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. त्यांनी या प्रकाराची माहिती तालुका पोलिस स्टेशनला कळवली. त्यानुसार पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील, पोलिस उपनिरीक्षक कल्याण कासार, वासुदेव मराठे, विश्वनाथ गायकवाड यांनी घटनास्थळ गाठले. मृतदेहाची पाहणी केली असता तो उचलुन नेण्याच्या अवस्थेत नव्हता. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पवार यांना घटनास्थळी पाचारण करून जागेवरच शवविच्छेदन करण्यात येवुन दफनविधी करण्यात आला.
मयताचे वय अंदाजे ५० ते ६० वर्ष असून त्याच्या अंगात लांब बाह्याचा फिकट राखाडी रंगाचा शर्ट व कमरेला काळ्या रंगाची पँट दोरीने बांधलेली असे त्याचे वर्णन होते. तो भिकारी असावा अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात शेतकरी एकनाथ घावदार यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल मोरे करीत आहे.