अलिबाग (वृत्तसंस्था) मालमत्ता, अनुकंपावरील नोकरीच्या वादातून भावानेच आपल्या दोन सख्ख्या बहिणींचा खून केल्याची खळबळजनक घटना अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे सूपमधून विष पाजून दोन बहिणींची हत्या केली. सोनाली शंकर मोहिते (३४) व स्नेहा शंकर मोहिते (३०) अशी मृत्यू पावलेल्या दोन बहिणींची नावे आहेत. तर गणेश शंकर मोहिते, असे आरोपी भावाचे नाव आहे.
नेमका काय होता वाद !
गणेश हा त्याची आई जयमाला, सोनाली व स्नेहा यांच्यासोबत राहत होता. गणेशचे वडील शंकर मोहिते वनविभागात अधिकारी होते. २००९ साली त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अनुकंपा तत्त्वावर कुणाला नोकरीस लावावे, यावरून गणेशचा आई व दोन बहिणींशी वाद होत होता. गणेश हा वडिलांच्या खोट्या सह्या करून बँकेतून पैसे काढायचा. त्याने वडिलांचे घर आपल्या नावे करून घेतले होते. त्यामुळे आपल्या पतीच्या जागी आपल्या एका मुलीला नोकरी मिळावी, असे आईचे म्हणणे होते. तर नोकरी आपल्याला मिळावी असे गणेशला वाटत होते. काही वर्षांनी गणेशने आई व दोन बहिणींना काही आश्वासन देऊन त्यांच्याकडून ना हरकत घेतली. त्यामुळे गणेशला २०२१ साली वनखात्यात नोकरी मिळाली. मात्र त्याला संपूर्ण मालमत्ता हडप करायची होती, परंतु दोन बहिणी त्याच्या मार्गात अडसर ठरत होत्या. त्यामुळे त्यांचा काटा काढण्याचा कट त्याने रचला.
सूपमधून उंदरांना मारण्याचे विष पाजले !
१५ ऑक्टोबर रोजी त्याने सोनाली आणि स्नेहा यांना सूपमधून उंदरांना मारण्याचे विष पाजले. त्यातून सोनाली हिचा १६ ऑक्टोबर रोजी अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला, तर २० ऑक्टोबर रोजी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात स्नेहाचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांची आई जयमाला यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली या तक्रारीत त्यांनी मालमत्तेवरून त्यांचे शेजाऱ्यांशी वाद होते. त्यांनीच पाण्यातून मुलींना दिले, असा संशय व्यक्त केला होता. गणेशदेखील शेजाऱ्यांना या प्रकरणात गुंतवण्याचा प्रयत्न करत होता. परंतु पोलिसांच्या नजरेतून तो सुटला नाही.
…म्हणून संशयाची सुई गणेशच्या दिशेने वळली !
दोन्ही बहिणींच्या मृत्यूनंतर घटनास्थळी जाऊन पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, आरोपी गणेश याची वर्तणूक चांगली नसल्याचे समजले. तसेच सोनाली हिच्या बॅगमध्ये काही कागदपत्र मिळाली. त्यावरून त्यांच्यात मालमत्ता, अनुकंपा नोकरीवरून वाद असल्याचे उघडकीस आले. पोलिसी खाक्या दाखविताच गणेश गुन्ह्याची कबुली दिली. गणेशनेच या दोघींना सूपमधून उंदीर मारण्याचे औषध पाजल्याचे उघडकीस आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गणशेला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
चार दिवसांत ५३ वेळा मोबाईलवरून शोधली विषाची माहिती !
मालमत्तेच्या मार्गात आड येणाऱ्या दोन बहिणींचा काटा काढण्याचा निश्चय गणेशने केला. तो पालघर येथे नोकरीस होता. सहा सहा महिने घरी येत नव्हता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तो सुट्टीच्या दिवशी रेवदंडा येथे येऊ लागला. त्यातून त्याची कुटुंबाशी जवळीक वाढवली. त्यांना सूप पिण्याची सवय लागावी यासाठी तो स्वतः सूप बनवून दोन बहिणींना देत असे. मागील आठवड्यात त्याने बहिणींना विष देण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने विषाच्या वेगवेगळ्या प्रकारांची माहिती गुगलवरून शोधली. कोणते विष किती वेळात परिणामकारक ठरू शकते याचा त्याने अभ्यास केला. दरम्यान, त्याने ४ दिवसांत ५३ वेळा आपल्या मोबाईलवरून विषाची माहिती शोधल्याचे पोलीस तपासात समोर आले. तसेच त्याच्या गाडीच्या डिकीत उंदीर मारण्याचे विष सापडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
यांनी केली गुन्ह्याची उकल !
या घटनेचा अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विशाल शिर्के, पोलीस उप निरीक्षक धनाजी साठे, पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, पोलिस हवालदार प्रतिक सावंत, यांनी केला.