जळगाव (प्रतिनिधी) दुचाकीची चावी हरवल्याने झालेल्या वादातून खोटेनगर स्टॉपजवळ मंगळवारी रात्री अविनाश निंबा आहिरे (३५, रा. कुसुंबा) या तरुणाला दोन जणांनी पकडून ठेवून तिसऱ्याने त्याच्यावर धारदार शस्त्राने पोटात व पाठीत सपासप वार केले होते. जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या अविनाशचा बुधवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवत तीन आरोपींना अटक केली आहे.
या गुन्ह्यातील संशयित दीपक प्रकाश पाटील (३२, रा. संत मीराबाईनगर, पिंप्राळा), अमोल गवई (२२), साहिल खान रशिदखान पठाण (२२, दोन्ही रा. पिंप्राळा) या तिघांना अटक करण्यात आली आहे. महेश पोपट सोनवणे (वय ४३, रा. चंदूअण्णानगर) आणि त्यांचा मामेभाऊ अविनाश निंबा अहिरे हे मंगळवारी (ता. ६) महेश सोनवणे यांच्या कारने बांभोरी येथील ढाब्यावर जेवणाला गेले होते. तेथे दीपक प्रकाश पाटील हा अविनाश अहिरे यांची दुचाकी घेऊन पोहोचला. तिघांनी जेवण केले. तेथेच दीपक व अविनाशमध्ये किरकोळ वाद झाला.
जेवणानंतर तिघे खोटेनगर स्टॉपवर पोहचले. दीपक व अविनाशमध्ये दुचाकीच्या चावी मागण्यावरून पुन्हा वाद सुरु झाला. त्याठिकाणी दीपक याचे मित्र अमोल आणि साहिल हे आले. आमच्या मित्राला का शिव्या देतो? म्हणत दोघांनी अविनाश याच्याशी वाद घातला. मात्र, आमच्या दोघांच्या वादामध्ये तुम्ही पडू नका, इथून जा असे अविनाश त्यांना सांगत होता. तर महेश सोनवणे (रा.चंदूअण्णानगर) याने आपला मामेभाऊ असेलेल्या अविनाशचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतू वाद वाढतच गेल्यानंतर दीपक व साहिल याने अविनाश याला पकडले आणि अमोल याने त्याच्याजवळील शस्त्र काढून अविनाशच्या पोटासह पाठीवर वार केले. तसेच, कारच्या काचाही फोडल्या.
जखमी अविनाशला तात्काळ जीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.परंतू बुधवारी पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात महेश पोपट सोनवणे (रा. चंदुअण्णा नगर ) यांच्या फिर्यादीवरून दीपक पाटील, साहिल खान, अमोल गवळी (रा. पिंप्राळा) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता तिघांविरुद्ध खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे.